पालघर : बुलेट ट्रेन, मुंबई बडोदा द्रुतगती महामार्ग, वाढवण बंदर असे देशातले सर्वात मोठे प्रकल्प ज्या पालघर जिल्ह्यात प्रस्तावित आहेत त्याच पालघर जिल्ह्यात गाव – पाड्यांना जोडणारे रस्ते नसल्यानं इथल्या प्रसूतीसाठी वेदना होणार्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी खांद्यावरील डोलीचा आधार घ्यावा लागत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे.
पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्या मधल्या झाप मनमोहाडी इथल्या गर्भवती महिलेला अचानक प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. मात्र गावापर्यंत रस्ता नसल्यानं कुटुंबासह गावकऱ्यांची ही तारांबळ उडाली. मनमोहाडी गाव आणि मुख्य रस्ता यांच्यामध्ये सहा ते सात किलोमीटर अंतर असून हा संपूर्ण भाग डोंगराळ आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गर्भवती महिलेला चादरीच्या डोलीचा आधार घेऊन हा डोंगर पार केला.
देश डिजिटल इंडिया कडे वाटचाल करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई लगत असलेल्या पालघर जिल्ह्यात अजूनही अनेक गावांना जोडणारे साधे रस्ते देखील नाहीत. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्यानं इथल्या अनेक रुग्णांचे मृत्यू झालेत. जव्हार – मोखाडा – विक्रमगड या भागात बालमृत्यू आणि माता मृत्यूंच प्रमाण देखील जास्त आहे. मात्र या सगळ्याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.