पालघर : राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधल्या जमीनींचे GIS आधारीत सर्वेक्षण आणि भूमापन करण्याबाबतचा गावठाण जमाबंदी प्रकल्प ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय आणि भारतीय सर्वेक्षण विभाग भारत सरकार यांच्या संयुक्त सहभागानं राबविण्यास महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागानं मान्यता दिली आहे. ड्रोनद्वारे गावठाण भूमापन हा प्रकल्प महत्वकांक्षी आणि जनताभिमुख प्रकल्प असुन या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन अचुक आणि जलद गतीने मोजणीचं काम करता येणार आहे.
हि योजना ग्रामविकास विभाग, भूमि अभिलेख विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त सहभागानं राबविण्यात येत असुन या योजनेच्या यशस्वीतेसाठी ग्रामसहभाग तसचं जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. महास्वामित्व योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यात ड्रोन ( Drone ) सर्व्हेसाठी एकुण ७७० गावं उपलब्ध असून त्यापैकी पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्या मधल्या ४५ गावांचं ड्रोन फ्लाइंग पुर्ण झालं असून पुढील काम सुरु आहे.
ड्रोन गावठाण प्रकल्पाची वैशिष्टे आणि फायदे :
ड्रोन द्वारे गावठाण भूमापन योजनेमुळे गावठाणातील मालमत्तांचे जी. आय.एस. आधारित रेखांकन आणि मुल्यांकन करण्यात येणार असून गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार केला जाणार आहे. गावठाणातील प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला यांना नगर भूमापन क्रमांक देण्यात येणार आहे. तसचं महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार गावठाणातील प्रत्येक मिळकतींच्या मिळकत पत्रिका तयार केल्या जाणार असून त्यांचं वाटप केलं जाणार आहे. या योजनेमुळे गावातील ग्रामपंचायतींचे आणि शासनाचे अॅसेट रजिस्टर तयार करण्यात येणार आहे.
महास्वामित्व ड्रोन गावठाण योजनेमुळे शासनाच्या मिळकतींचं संरक्षण होणार असून ग्रामस्थांना त्यांच्या मालकी हक्काचा नकाशा आणि अभिलेख मिळकत पत्रिका (Property Card) मिळण्यास मदत होवू शकेल. या मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे ग्रामस्थांना घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होणार असून मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता आल्यामुळे गावाची आर्थिक पत उंचावण्यास मदत होवू शकेल. ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन करणे यासाठी अचुक अभिलेख आणि नकाशा उपलब्ध होण्यास या योजनेमुळे मदत होणार आहे.