पालघर : बोलींचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातल्या मराठी विभागानं २७ एप्रिलला बोलीत बोलू या अनोख्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. हि सर्वांसाठी खुली स्पर्धा असून जिल्ह्यातल्या कोणत्याही एका बोलीत स्पर्धकाला बोलता येणार आहे. या अभिव्यक्तीत एखादा किस्सा, माहिती, गोष्ट, विनोद, अनुभव, व्यक्तिचित्रण असं काहीही असेल. मात्र त्यात राजकीय पक्ष, राजकीय तेढ, धार्मिक तेढ, बदनामी अशी कोणती गोष्ट नसावी. वारली, कोकणा, मल्हार, कोळी, आगरी, भंडारी, वैती, मांगेला, वाडवळ, कुणबी, मांगेला, बारी, माळी माच्छी, पांचाळ, फुदगी आदी पैकी कोणतीही एक बोली भाषा स्पर्धकाला निवडता येईल. यावेळी स्पर्धकांना बोलण्यासाठी सात मिनिटं दिली जातील.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणा–या स्पर्धकाला ३००० रुपये, द्वितीय क्रमांक मिळवणा–या स्पर्धकाला २००० रुपये, तृतीय क्रमांक मिळवणा–या स्पर्धकाला १५०० रुपये आणि उत्तेजनार्थ १००० रुपये पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी नावनोंदणीची शेवटची तारीख हि 22 एप्रिल असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातले सहा.प्राध्यापक विवेक कुडू यांच्याशी ९०४९५३०४१५ नंबर वर संपर्क साधावा. आणि जास्तीत जास्त संख्येने बोलकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन बोली संवर्धनाच्या चळवळीत आपलं सहकार्य दयावं असं आवाहन प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केलं आहे.