पालघर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या तक्रारींची जनसुनावणी उदया पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.३० वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या स्वतः तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहे. महिलांनात्यां च्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकारानं राबविण्यात येत आहे. यात विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचं निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीच्यावेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातल्या महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणं, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आर्थिकदृष्ट्या तसचं इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचं काम आयोग करत आहे. पालघर जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात असं आवाहन आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी केलं आहे.