पालघर : इतर जिल्ह्याच्या तुलनेत पालघर जिल्ह्यामध्ये अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण कमी असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. त्यामुळे अतिशय समाधानकारक चित्र मला इथे दिसलं असं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातल्या तक्रारींची जनसुनावणी आज घेण्यात आली. या जनसुनावणी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या .
कोविडच्या गेल्या दोन वर्षाच्या काळात बाल विवाह , कौटुंबिक हिंसाचार या सारख्या घटनांचं प्रमाण वाढल्याच दिसून आलं. यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. बाल मृत्यू आणि माता मृत्यूच वाढत प्रमाण पाहता कायद्यात सुधारणा करावी अशी शिफारस शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. जे रेकॉर्ड वरती आहे त्याच्या व्यतिरिक्त ही काही घटना आहेत का किंवा काही घटनांची नोंद आपल्याकडे पोहचलेली नाही का या सर्वांचा आढावा घेण्यासाठी आम्ही आज आलो असल्याचं यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या तक्रारींची जनसुनावणी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असून महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकारानं राबविण्यात येत आहे. विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचं निवारण करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
आजच्या जनसुनावणीच्या माध्यमातून तात्काळ पीडितेला न्याय देणं आणि आरोपीला कायद्याच्या चौकटीतुन शिक्षा करणं हा या मागचा उद्देश असल्याचं चाकणकर यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणं, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आर्थिकदृष्ट्या तसचं इतर कारणामुळे शक्य होत नाही. मात्र आयोगाचं कार्यालय, सदस्य त्यांच्यापर्यंत पोहचू शकतात. अशा महिलांसाठी महिला आयोग त्यांच्या दारी जाऊन तक्रार घेणार आहे. या निमित्तानं प्रशासनाचं सुरू असलेलं काम, प्रशासनाचा महिलांना मिळत असलेला प्रतिसाद याचा सगळा आढावा एकत्रित जनसुनावणीच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत असं ही त्या म्हणाल्या.
या जनसुनावणीच्या यावेळी 4 पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलमध्ये राज्य महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया, सुप्रदा फातर्पेकर विधी व न्याय विभागाचे अधिकारी समुपदेशन, वकील आदिंचा समावेश होता. या पॅनलच्या माध्यमातून आज 80 प्रकरणावर जनसुनावनी घेण्यात आली. येणाऱ्या तक्रारीचं निवारण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सकाळपासून महिलांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या जनसुनावणीला मिळाला.
महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचं काम आयोग करत आहे. पिडीत महिलांना पोलीस स्टेशन किंवा राज्य महिला आयोगाकडे येता येत नसेल तर अशा महिलांनी राज्य महिला आयोगाच्या टोल फ्रि क्र.155209 वर तसचं शहरी भागांसाठी टोल फ्री क्र. 1091 आणि ग्रामिण भागासाठी 112 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करुन आपली तक्रार नोंदवावी असं आवाहन यावेळी चाकणकर यांनी केलं.