पालघर : पालघर जिल्ह्यात अनेकानेक वर्षांपासुन Lymphatic Filariasis किंवा हत्तीरोगाचा प्रादुर्भाव आढळुन येत आहे. हा आजार क्युलेक्स प्रजातीच्या डासांमार्फत मानवास होतो. सेप्टिक टँक, घाण / निचऱ्याच्या जागी आणि गटारे अशा दुषित पाण्याच्या जागी या डासांची पैदास होते.
जिल्ह्यात ऑक्टोंबर २०२१ मध्ये राबविण्यात आलेल्या संक्रमण पडताळणी सर्वेक्षण (TAS) मोहीमेत ६ ते ७ वर्ष वयोगटातल्या निवडक लहान मुलांच्या तपासणीत डहाणु, विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात सर्वाधिक २९ बालके हत्तीरोगानं संक्रमित आढळुन आली आहेत. सन २०१६ ते २०२२ या कालावधितल्या विविध सर्वेक्षणात याच ३ तालुक्यात १४७ व्यक्ती हत्तीरोगानं संक्रमित आढळुन आल्या आहेत.
यासाठी या ३ तालुक्यात २५ मे ते ५ जुन या कालावधीत “सामुदायिक औषधोपचार मोहीम” राबविण्यात येणार आहे. डहाणु, तलासरी आणि विक्रमगड मध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्यानं या तीन तालुक्यात पुढील दोन वर्ष सामुदायीक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे.
बालकांचं भवितव्य हत्तीरोग मुक्त ठेवण्यासाठी २५ मे पासुन राबविण्यात येणाऱ्या सामुदायीक औषधोपचार मोहीमेत डहाणु, तलासरी आणि विक्रमगड तालुक्यातल्या मुलांनी, प्रौढ व्यक्ती आणि वयोवृद्ध या सर्वांनी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे प्रत्यक्ष सेवन करणं आवश्यक असल्याचं जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी आयोजित बैठकीत सांगीतलं.