पालघर : राज्य परिवहन मंडळाची भुसावळ हुन बोईसर ला येणारी एसटी बस पालघर जिल्ह्यातल्या वाघोबा घाटात खाली कोसळली. या अपघातात जवळपास 25 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमी प्रवाश्यांना पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना आज सकाळी सहा ते सव्वा सहा वाजताच्या दरम्यान घडली.
या बसचा चालक नाशिक इथं बदलण्यात आला. मात्र हा चालक मद्यपान करून असल्याचं काही प्रवाश्यांचं म्हणणं आहे. या मद्यधुंद भरधाव वेगात एसटी बस चालवणाऱ्या चालकाचं बोईसर च्या दिशेनं येत असताना पालघरच्या वाघोबा घाटात बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस वाघोबा घाटात उलटली.
प्रवाश्यांनी माहिती देताना सांगितलं की, आम्ही वारंवार एसटी बसच्या कंडक्टरला सांगत होतो की, चालक मद्यधुंद अवस्थेत आहे. त्याच्या हातामध्ये गाडीचं स्टेअरिंग देऊ नका. तरी सुद्धा कंडक्टरनं आमचं काही एक ऐकलं नाही. हा चालक मात्र अगदी वेगात गाडी चालवत होता. त्यामुळेच हा अपघात झाला असा दावा या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांनी केलाय. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, आरोग्य विभागानं घटनास्थळी पोहचून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर सर्व जखमी प्रवाश्यांना सोडण्यात आलं.