पालघर : हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
वटपौर्णिमे निमित्त आज पालघर मधल्या लक्ष्मी नारायण मंदिराजवळ असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पालघर भागातल्या महिला जमल्या होत्या. इथं मोठ्या भक्तीभावाने आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून आली. बोईसर, पालघर सह जिल्ह्यातल्या इतर भागांत ही महिलांनी ठीकठिकाणी असलेल्या वडांच्या झाडांची पूजा करून वटपौर्णिमा साजरी केली.
काय आहे या पारंपरिक व्रताची कथा :
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी आणि मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. आणि जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली आणि तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले आणि पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे आणि राज्य परत मागितले. तसचं आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली. आणि सत्यवानाचे प्राण परत करावे लागले.
सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले होते म्हणून जेष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात. आणि वट सावित्री व्रत आचरतात.