पालघर : राजकारण्यांचं आणि साहित्यिकांचं जवळचं नात आहे असं प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केलं. तसचं पालघर जिल्ह्यातील कला, संस्कृती आणि इथल्या साहित्यिक परंपरांचं संवर्धन व्हावं, यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून राज्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्यासह मिळून प्रयत्न करून इथे लवकरच एक स्वतंत्र ऑडिटोरियम उभारू, आणि या पुढंचं होणार अमहिला साहित्य संमेलन या कॉलेज मध्ये नव्हे तर त्या सभागृहात करू असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. कोकण मराठी साहित्य परिषदेकडून पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचं आयोजन पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात करण्यात आलं होतं. 11 आणि 12 जून ला आयोजित हे सहावं राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन होत. या संमेलनाची सांगता रविवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन हे महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम यांच्या हस्ते झालं. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे दोन दिवसीय महिला साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं. या दोन दिवसांच्या संमेलनात पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री निशिगंधा वाड, जेष्ठ कवियत्री नीरजा, अभिनेत्री मधुरा वेलणकर – साटम, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लोककलांना उजाळा देणाऱ्या लोकरंग आणि पदपन्यास कार्यक्रमात विविध प्रसिद्ध कवींच्या कवितांवर आधारित नृत्य आणि जुन्या गाण्यांवर अतिशय सुंदर रीतीनं नृत्य सादर करण्यात करण्यात आलं. तसचं या महिला संमेलनात पालघर जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या गुणवंत महिलांचा सत्कार देखील करण्यात आला. या संमेलनात महिला सक्षमीकरणावर आधारित एक चर्चा सत्र देखील आयोजित करण्यात आलं होतं. त्यात राजकारण, पत्रकारिता, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लेखन साहित्यातील महिलांची स्थिती, त्यांच्यावर होणारे आक्षेप अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. शिरीष पै नावानं ठेवण्यात आलेल्या ग्रंथ दालनात सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाकडून वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं साहित्यिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. आणि त्याचबरोबर लता मंगेशकर यांच्या नावानं एक कला दालन देखील ठेवण्यात आलेलं होतं.
हे पालघर जिल्ह्यात पहिल्यांदा भरलेलं राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन होतं. त्यामुळे अतिशय उत्स्फूर्तपणे लेखन, साहित्य क्षेत्रातल्या कोकण विभागातल्या विविध जिल्ह्यातल्या महिला या संमेलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. हे महिला साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संपूर्ण टीमनं, सोनोपंत दांडेकर महाविद्यालचे प्रिंसिपल डॉ. किरण सावे आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यांनी मोलाचं सहकार्य केलं.