पालघर : पुर्नरचित (Revamped) राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2022-23 अंतर्गत पंचायत राज व्यवस्थेमध्ये कार्यरत लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी यांच्या प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी उपक्रमाच्या आयोजनाबाबत उत्कृष्ट कामगिरी करत ग्रामीण लोकशाही बळकट करण्यात मोलाचं योगदान दिल्याबद्दल पालघर जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक आला आहे.
त्यामुळे ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासनामार्फत पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचा सन्मान करण्यात आला आहे. यासाठी राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान महाराष्ट्र राज्य पुणे आणि संचालक राज्य ग्रामीण विकास संस्था यशदा पुणे यांच्यामार्फत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं.
सन 2022- 23 या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत विकास आराखडा संबंधी प्रशिक्षण उपक्रम, पेसा कायदा अंमलबजावणी संदर्भात प्रशिक्षण तसचं संयुक्त राष्ट्र संघानं शाश्वत विकासाच्या उद्देशानं जाहीर केलेल्या जागतिक कार्यक्रम २०३० पर्यंत १७ शाश्वत विकासाची धेय्य ( Sustainable Development Goals ) साध्य करण्याच्या उद्देशानं विकास आराखडयात ९ संकल्पना समाविष्ट करण्या संदर्भात तालुका आणि ग्रामपातळीवर प्रशिक्षण उपक्रमाचं यशस्वी आयोजन केलं होत.
या अंतर्गत जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या विभागाचे (Line Dept.) अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, मुख्यसेविका, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्तरीय कर्मचारी, ग्रामसंसाधन गटाचे प्रतिनिधी, महिला स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष आणि सचिव, पेसा मोबिलाईझर, ग्रामसभा मोबिलाईझर अशा जिल्हयातल्या एकूण २४,३२१ प्रशिक्षणार्थींचे विविध पातळीवर प्रशिक्षण घेण्यात आलं.
या प्रशिक्षण उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) चंद्रशेखर जगताप, जिल्हा/ तालुका स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी, प्राचार्य पंचायत राज प्रशिक्षण केंद्र / ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोसबाड हिल डहाणू, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियाना अंतर्गत जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील लेखापाल तथा सनियंत्रण, मूल्यमापन सनियंत्रक मंगेश तामोरे, लिपिक वैभव नाईक यांनी विशेष योगदान दिले.