पालघर : पालघर पोलीस विभागामार्फत जनसंवाद अभियान अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या सुशिक्षीत बेरोजगार तरुण-तरुणींसाठी तसचं पोलीस पाल्यांसाठी पालघर जिल्ह्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून इथले बरेच तरुण-तरुणी हे बेरोजगार असल्याचं आढळून येतं. तसचं पोलीस प्रशासनानं पालघर जिल्हयातल्या दाखल गुन्हयांचा आढावा घेतला असता बहुतांश गुन्हयांमध्ये सुशिक्षीत युवकांचा समावेश असल्याचं त्यांना आढळुन आलं. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळताना बहुतांश तरुण वर्ग हे वेगवेगळया आमिषाला बळी पडत असल्याचं पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आलं. त्या अनुषंगानं अशा प्रकारच्या आमिषाला बळी न पडता इथल्या तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशातून जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगारांना विक्री आणि विपणन, बँक ऑफिस, संगणक ऑपरेटर, प्रोडक्शन, गुणवत्ता, देखभाल, जोडारी, स्टोअर & पॅकेजिंग सॉफ्टवेअर डेव्हलपर हार्डवेअर & नेटवर्किंग, ग्राफिक डिझायनर, टेक सपोर्ट सेवा, हॉटेल व्यवस्थापन, मीडिया रिपोर्टर, डॉक्टर, नर्सिंग, डिलिव्हरी बॉईज, वैद्यकीय टेलिकॉलर, ड्रायव्हर्स, ऑपरेशन्स, लेखापाल, प्रशासक, सुरक्षा, सुविधा व्यवस्थापन-देखभाल, वेब डेव्हलपर, सोशल मिडिया कार्यकारी, विमा सल्लागार, पर्यवेक्षक, गार्डनर, सेवा कार्यकारी अभियंता, मेकॅनिक, लॅब टेक्निशियन, भर्ती करणारा, फ्रंट ऑफिस, व्यवसाय विकासक, लोडर आणि अनलोडर, शिपाई, फ्रीलान्सर आणि इतर विविध क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकेल. यासाठी लागणारी शैक्षणीक पात्रता ही इयत्ता पाचवी ते सर्व शाखेतील पदवीधर आणि पदव्युत्तर अशी असून वयोमर्यादा ही १८ ते ४० वर्ष इतकी आहे.
चौदा वर्षाच्या मुलानं आईची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबण्यासाठी खणली विहीर…..
या रोजगार मेळाव्यात पालघर जिल्ह्यातल्या बोईसर-तारापुर एमआयडीसी, पालघर, वाडा आणि तलासरी भागां मधल्या तसचं जिल्ह्या बाहेरील लहानमोठ्या अशा विविध जवळपास ७५ कंपन्या रजिस्टर झाल्या आहेत. या रोजगार मेळाव्यासाठी आतापर्यंत ३४०० उमेदवारांनी आपली नोंदणी केली आहे. या मेळाव्याचं ख़ास वैशिष्ट्य असं आहे की, यामध्ये उमेदवारांना आपल्या पात्रतेनुसार आवड असलेल्या क्षेत्रात आणि हव्या असलेल्या क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि कंपनी या दोन्हींच्या रिक्वायरमेंट्स अगोदर घेतल्या जातील आणि मग त्यानुसार त्या त्या कंपन्यांना हव्या असलेल्या स्कीलचे उमेदवार निवडता येतील.
या रोजगार मेळाव्यासाठी http://bit.ly/4260wjA या लिंकवर किंवा सोबत दिलेल्या बारकोडवर जावून आपल्याला हव्या असलेल्या क्षेत्रात अर्ज भरून नाव नोंदणी करता येईल. अर्ज करण्याची शेवटची मुदत ही १५ मे पर्यंत आहे. दिलेल्या लिंकवर नाव नोंदणी करण्यासाठी काही अडचण आल्यास जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अडचणीचं निरसन करण्यासाठी पोलीस अंमलदारांची नेमणूक देखील करण्यात आली आहे.
पोलीस पाल्यांना ही मिळत नाही नोकरी :
बेरोजगारी ही जिल्ह्यातली एक मोठी समस्या असून अनेक तरुण – तरुणी या बेरोजगार आहेत. जिल्ह्यातल्या पोलीस पाल्यांच्या नोकरीचा प्रश्न देखील मोठा आहे. जिल्ह्यात जवळपास १७०० इतके पोलीस पाल्य असून पोलिस कर्मचा-यांच्या ही पाल्यांना नोक-या मिळत नाहीत. त्यामुळे या मेळाव्यात त्यांचा ही विचार करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात चारशे ते साडे चारशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांची देखील नोदणी झाली आहे. अशी माहिती पालघर चे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटिल यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत दिली.