पालघर : पालघर जिल्ह्यातल्या केळव्या मधल्या धावांगे पाडा इथं रहणा-या नववीत शिकणा-या चौदा वर्षाच्या प्रणव सालकर या मूलानं आपल्या आईची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबण्यासाठी आपल्या घराच्या अंगणातचं चार ते पाच दिवसांत नऊ फुटाचा खड्डा खोदून एक छोटीशी विहीर तयार केली आहे. ही विहीर खोदण्यासाठी त्यानी एक लाकडी तयार केलेली शिडी, पहार आणि टिकाव या साहित्याचा वापर केला.
या मुलाचे आई- वडिल हे इतरत्र मजूरी साठी जातात. दरम्यान गावात कधी कधी एक दोन दिवसा आड तर कधी कधी आठ आठ दिवस पाणी येत नाही. जरी पाणी आलं तर ते रात्रीच्या वेळी येते. आणि त्यासाठी ही काही दूर अंतरावर त्याच्या आईला मोल मजूरी करून आल्यावर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असे. हे सर्व पाहता या मुलाने ही छोटीशी विहीर खोदायला सुरुवात केली आणि चार ते पाच दिवसात त्यांनी ही नऊ फुट खोल खड्डा खणला आणि त्यात गोड पाणी देखील लागलं . इथली माती ही रेतीसारखी भुसभूशीत असल्यानं त्याला ही विहीर खणता आली.
ही बाब लक्षात आल्यानंतर केळवे ग्रामपंचायतीने या नऊ फुटाच्या खड्ड्याला अजुन तीन फुट खोल खणुन तो बारा फुटाचा केला आणि त्याला विहीर स्वरूपात दोन दिवसांत बांधून दिलं आहे. त्यामुळे आता ही छोटीशी विहीर १२ फुटांची झाली असून तिला गोड पाणी लागलं आहे.
केळवे ग्रामपंचायतीची एकुण लोकसंख्या ही ११ हजारांपेक्षा जास्त असून या गावात केवळ पाण्याच्या दोन टाक्या आहेत. मात्र त्या सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे केळव्यात असलेल्या झांझरोळी धरणातुन या ग्रामपंचायती अंतर्गत येणा-या गावापाद्यांना विना प्रक्रिया सरळ हे पाणी सोडलं जात. त्यामुळे ते दूषित पाणी असतं. आस पास मिठागर असल्यानं इथल्या बोरिंग आणि इतर पाण्याच्या स्त्रोतांना खार पाणी येत. जे पिण्या योग्य नसते. नळा द्वारे दिलं जाणारं पाणी हे आठवड्यातुन तीन दिवस येत. जात तर कधी आठ आठ दिवस देखील पाणी येत नाही. ना इलाजासत्व इथल्या लोकांना दूषित पाणी पिनं भाग पडते.