पालघर : झाडं ही मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, ती मनुष्य जीवनाची आधार आहेत. शिवाय पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वृक्षांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मात्र असं असताना देखील आजच्या काळात मानव आपल्या नवनवीन शोधांच्या अभिलाषेमुळे पर्यावरणाला हानी पोहचवत आहे. त्यामुळे आजच्या काळात पर्यावरणाचं संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. सध्या पर्यावरणाचं संतूलन हे मोठ्या प्रमाणावर धासळत चाललेलं असून त्याबाबत वेळीच जागरुकता न झाल्यास येणार्या काळात मानवाला गंभीर समस्यांना समोरं जावं लागू शकतं. याच गोष्टीचा विचार करत पालघर जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेत शिकणा-या चिमुकल्यांनी आपल्या शिक्षकाकडून पर्यावरण संरक्षणाचे धडे घेवुन विविध प्रकारच्या झाडांच्या बिया एकत्रित करून त्यापासून सीडबॉल्स तयार केले आहेत. आणि आता पासूनचं या चिमुकल्यांची पावलं ही पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनं वळू लागली आहेत.
पालघर जिल्ह्यातल्या १६ अनधिकृत शाळांच्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल……..
हे आहेत, पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या टोकेपाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेतले पहिली ते चौथीचे विद्यार्थी. ५३ इतकी पट संख्या असलेल्या या शाळेतल्या पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या झाडांच्या बिया गोळा करून त्यापासून २३ हजारांपेक्षा अधिक सीड बॉल्स तयार केले आहेत. शालेय परीक्षा संपल्यानंतर देखील शाळेचे पर्यावरण पूरक उपक्रम पूर्ण करण्यासाठी शाळेतल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपला वेळ देत हा अनोखा उपक्रम केला आहे. या शाळेतले शिक्षक हे विद्यार्थ्यांना नेहमीच पर्यावरण संवर्धनाचे धडे देत असतात आणि त्यातून ते या विद्यार्थ्यांकडून अनेक पर्यावरण पूरक असे उपक्रम पूर्ण करून घेत असतात. “जय विज्ञान जय स्वछता” या ब्रीदवाक्याच्या आधारे शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात आणि त्यातलाचं हा एक उपक्रम म्हणजे सीड बॉल्स तयार करणे.
कोरानाच्या काळात ऑक्सीजनसाठी लोकांची होत असलेली धडपड पाहता आणि उन्हाळ्यात लोकांची सावली शोधण्यासाठीची शोधाशोध पाहता या शाळेतले शिक्षक दिपक देसले यांना त्यांच्या निरीक्षणातुन असं लक्षात आलं की, वृक्ष लागवड नव्हे तर वृक्ष जगवणं हे खुप महत्त्वाचं आहे. या विचारातूनचं त्यांनी कोरोनानंतर आपल्या आसपासच्या परिसरात तीवर, कडूलिंब, आंबा, वड यांसारखी वृक्ष लावण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचं महत्त्व समजावून सांगितल. आणि गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक देसले यांनी आपल्या विद्यार्थ्यां सोबत हा सीड बॉल्स तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
हे सीड बॉल्स तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी अगोदर चिंच, रक्तचंदन, आपटा, फुलकेसर (लाजरा), बोर, रिठा, गुंज आणि इतर काही वेली अशा जवळपास आठ ते दहा झाडांच्या बियांचं संकलन केलं. आणि त्यानंतर चिंचेच्या बियांपासून ८८०० सीड बॉल्स, रक्तचंदनाच्या बियांपासून १८००, आपटयाच्या बियांपासून ३४५०, फुलकेसरच्या (लाजरा) बियांपासून ५६४०, बोरांच्या बियांपासून १६०६, रिठाच्या बियांपासून ९७२, गुंजच्या बियांपासून ८६५ आणि इतर काही वेलींच्या बियांपासून ९० इतके सीड बॉल्स असे एकुण २३ हजार २२३ सीड बॉल्स तयार केले.हे सीड बॉल्स तयार करण्यासाठी त्यांनी वारूळाची माती, चिकूच्या बागेतली माती, शेणखत आणि विविध झाडांच्या बियांचा वापर केला.
हे सीड बॉल्स पुढच्या जुलै महिन्यात वनखात्याच्या परवानगीनं डोंगरावर आणि इतर काही ठिकाणी टाकण्यात येणार आहेत. याच विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी दहा हजार सीड बॉल्स तयार करून वनखात्याच्या शासकीय नर्सरीत टाकले होते. मात्र यंदा या विद्यार्थ्यांनी त्यांचाच उच्चांक मोडीत काढून २३ हजारांपेक्षा जास्त सीड बॉल्स तयार करून आपला विक्रम नोंदवला आहे. या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेला हा विक्रमी उपक्रम इतर लोकांना नक्कीच प्रेरणा देणारा ठरू शकेल.