पालघर : पालघर जिल्ह्यातल्या चिंचणी इथं समुद्रकिनारी असलेल्या गावदेवी मैदानात रविवारी नागरी सत्कार समिती कडून भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार सोहळ्यात दहिसरच्या आमदार मनीषा अशोक चौधरी यांचा उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून नागरी सत्कार करण्यात आला.
आमदार मनीषा चौधरी यांनी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातल्या शेतकरी, मच्छीमार, महिला उद्योजक, पर्यटक, व्यवसायिक, आदिवासी आणि इतर घटकांसाठी मोलाचं कार्य केलं आहे. आणि त्यांच्या या कार्याची दखल घेत रविवारी चिंचणी इथं नागरी सत्कार समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला.
माहेर चा सत्कार हा खुप महत्वाचा असतो. आज हा सत्कार स्विकारताना माझा सर्व राजकीय प्रवास हा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला असं मत यावेळी आमदार मनीषा चौधरी यांनी व्यक्त केलं. सत्काराच्या स्वरूपात आज मला माझ्या कामाची पोच पावती मिळाली. या सत्कारात मला जी शाल ओढवली गेली त्यामूळे माझ्यावरच ओझ वाढलं आहे, माझी जबाबदारी आता वाढली आहे. पालघरच्या लोकांची आणि माझ्या वार्डातल्या लोकांनी मला आपुलकीची साथ दिली आणि त्याच मुळे २०१४ मध्ये आणि त्यांनतर पुन्हा २०१९ मध्ये मी आमदार म्हणून निवडून आली. मला मंत्री पद नको, तर मला जनतेची साथ हवी आहे असं ही त्या यावेळी म्हणाल्या. त्यांच्या कार्याची दखल घेत पालघरकरांनी केलेल्या सत्कारासाठी चौधरी यांनी यावेळी कृज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि महाराष्ट्र गीताने करण्यात आली. त्यानंतर जय शारदे वाघेश्वरी या ईशस्तवन गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी सोनोपंत दांडेकर विद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण सावे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं.
या सत्कार सोहळ्यात सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून उत्तर प्रदेश चे माजी राज्यपाल – माजी केंद्रीय रेल्वे व पेट्रोलियम मंत्री राम नाईक, खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, श्रीनिवास वनगा, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वसई – विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातले नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात आमदार मनीषा चौधरी यांच्या संपुर्ण कार्यावर आधारित एक चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंकजा मुंडे, सुनील देवधर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावकुळे आदींनी पत्राद्वारे आमदार मनीषा चौधरी यांना त्यांच्या सत्कारासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात आमदार मनीषा चौधरी यांच्या जीवनपटावर आधारित गौरव पुस्तिकेचं प्रकाशन देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
मनीषा चौधरी यांची राजकीय वाटचाल :
त्यांचा जन्म पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी या ठिकाणी झाला. पालघर जिल्ह्यातून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. डहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. आज मुंबई मधल्या दहिसरच्या आमदार असताना ही त्या पालघर जिल्ह्यातल्या विविध समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.