नवी मुंबई, दि. २७ -: भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने सतर्क भारत-समृध्द भारत” ही संकल्पना घेवून कोकण भवनमध्ये आज दक्षता जनजागृती सप्ताहाचा सत्यनिष्ठेची प्रतिज्ञा घेऊन प्रारंभ करण्यात आला. विभागीय महसूल कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई येथील पहिल्या मजल्यावरील बैठक सभागृहात सकाळी 11.00 वाजता श्री. गिरीश भालेराव (उपायुक्त विकास) यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली.
दरवर्षी 31 ऑक्टोंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती येते, त्या सप्ताहात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा यांबद्दलच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. यंदाच्या 2020 या वर्षी हा सप्ताह केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सुचीनुसार दिनांक 27 ऑक्टोबर 2020 ते 2 नोव्हेंबर 2020 या कालावधीत “सतर्क भारत, समृध्द भारत (Vigilant India, Prosperous India)” ही संकल्पना घेऊन साजरा करण्यात येत आहे.
गिरीश भालेराव यांनी सर्व प्रथम महाराष्ट्राचे मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मा. मुख्यमंत्री, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जनतेला दिलेल्या संदेशाचे वाचन केले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. यावेळी उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटाईझरचा योग्य वापर केला. याप्रसंगी कोकण भवनमधील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.