नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कोविड-१९ च्या काळात महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत ३९.४६ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. अशी सूचना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य, राज्यमंत्री ना. अब्दूल सत्तार यांनी केली.
आज नवी मुंबई येथे सिडको भवनातील राज्य अभियान व्यवस्थापन कक्षात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य गामीण जीवनोन्नती अभियान आर विमला, अतिरिक्त संचालक मानसी बोरकर, अव्वर सचिव चंद्रमणी खंदारे, उपसंचालक दादाभाऊ गुंजळ, राजेश जोगदंड, अश्विनी भोसले व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटाईझरचा योग्य वापर केला होता.
प्रारंभी ‘उमेद’च्या संचालिका आर विमला यांनी विविध योजनांच्या प्रगतीचे सादरीकरण केले.
सत्तार म्हणाले की, गरिबी निर्मूलनासाठी गावातील गरीब, गरजू आणि वंचित कुटुंबातील महिलांचे स्वयंसहाय्यता समूह प्रभाविपणे कार्य करीत आहेत. या माध्यमातून सामाजिक समावेशण आणि संस्थांची बांधणी होत आहे. या अभियानांतर्गत आता पर्यंत ४ हजार १७ ग्रामपंचायती सहभागी झाल्या असून, आगामी काळात अजून ४ हजार २२४ ग्रामपंचायती सहभागी होतील. यासाठी प्रभावी प्रशिक्षण सुविधा देखील राबविण्यात येत आहेत. उमेद अभियानांतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये १ लाख ९६ हजार ७११ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे कोविड-१९ चा प्रदूर्भाव रोखण्यासाठी स्वयंसहाय्यता गटाने चांगले काम केले आहे. या काळात १८ हजार १४८ महिलांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. ८ हजार ४४४ स्वयंसहाय्यता संघांच्या माध्यमातून १ कोटी मास्कच्या निर्मितीतून ११.२६ कोटी रुपयांची, २०.३८ मॅट्रीक टन फळे विक्रीच्या माध्यमातून ४.७ कोटी रुपयांची, २० हजार ९५९ मॅट्रीक टन भाजीपाला विक्रीतून १९. ४३ कोटी रुपयांची आणि ३ हजार ७३५ मॅट्रीक टन धान्य विक्रीतून ४.७० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. हे विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध योजनांचा आढावा :
महाराष्ट्र राज्य गामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सुमतीवाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमिकरण योजना, उपजिविका वृध्दीसाठी शेती व बिगरशेती आधारीत उपक्रम, महालक्ष्मी सरस, महिला किसान सशक्तीकरण परियोजना, राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प, ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, कृतीसंगम अन्न, आरोग्य, पोषण व स्वच्छता अस्मिता योजना, दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सांसद आदर्श ग्राम योजना अशा महत्त्वाच्या योजनांचा आढावा सत्तार यांनी घेतला.