पालघर – मुंबई विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या एल. एल.बी. अंतिम परीक्षेच्या निकालानुसार सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या विधी महाविद्यालयाचा (SDSM) निकाल १०० टक्के लागला आहे. मुंबई विद्यापीठाने तृतीय वर्ष एल. एल.बी. या परीक्षेचा निकाल दि. २८/१०/२०२० रोजी जाहीर केला. या परीक्षेस दांडेकर शिक्षण मंडळीच्या विधी महाविद्यालयाचे ५१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. पालघर जिल्ह्यातील सर्वप्रथम स्थापन झालेल्या या विधी महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीचे सर्व विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कु. क्षिप्रा अश्विन भानुशाली हि विद्यार्थिनी ७६.५% (सहाव्या सत्रामध्ये ९२ टक्के गुण प्राप्त) गुण मिळवून महाविद्यालयात सर्व प्रथम आली आहे. पुढे एल. एल.एम. करून मुंबई उच्च न्यायालयात करिअर करण्याचे आपले ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया कु. क्षिप्रा हिने दिली.
या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि विशेषतः प्रथम तीन क्रमांकाच्या १) भानुशाली क्षिप्रा, २) सावला विद्या, ३) दळवी प्रशंसा या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड्. जी.डी. तिवारी आणि विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयाच्या १०० टक्के निकालाबरोबरच एकूण २४ विद्यार्थी प्रथम वर्गाने उत्तीर्ण झाले आहेत, हि संस्थेच्या व महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष अॅड्. जी.डी. तिवारी यांनी व्यक्त केली. पुढील शैक्षणिक वर्षापासून पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाबरोबरच पदव्युत्तर विधी अभ्यासक्रम (एल. एल.एम.) सुरु करण्याचा संस्थेचा मानस आहे असेही त्यांनी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, सुनिल चित्रे, कोषाध्यक्ष हितेंद्र शाह, सचिव प्रा. अशोक ठाकूर, अतुल दांडेकर, सहसचिव जयंत दांडेकर यांनी सदर निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे.