दानात 54 लाख 49 हजार किमतीच्या सोन्याचा समावेश
शिर्डी : नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त शिर्डीच्या श्री साईबाबा देवस्थानात आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या जवळपास ९ दिवसांच्या काळात 8 लाखाहुन अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं. या काळात सुमारे 16.61 कोटी रुपयांची देणगी आली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी दिली.
देवस्थानाला २५ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात दानपेटीतून ०६,१२,९१,८७५ रुपये, देणगी काउंटरव्दारे ०३,२२,२७,५०८ रुपये, पी.आर.ओ. सशुल्क पासद्वारे ०१,९६,४४,२००रूपये, डेबीट-क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी आणि मनी ऑडरव्दारे ०४,६५,७३,६९८ रुपये अशी एकुण १५ कोटी ९७ लाख ३७ हजार २८१रुपयांची देणगी रोख स्वरुपात प्राप्त झालेली आहे. तसेच ५४,४९,६८६ रक्कमेचे ८०९.२२० ग्रॅम सोने, ०९,९३,८९५ रक्कमेची १४ किलो ३९८ ग्रॅम चांदी देणगी स्वरुपात प्राप्त झाली आहे. अशाप्रकारे विविध माध्यमातुन एकुण १६ कोटी ६१ लाख ८० हजार ८६२ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे.
पहा व्हिडीओ :
तसेच या कालावधीत श्री साई प्रसादालयात ०६ लाखाहुन अधिक साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर १ लाख ३५ हजाराहुन अधिक साईभक्तांनी अन्नपाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ०९,४७,७५० लाडु प्रसाद पाकीटांची विक्री करण्यात आली असून याव्दारे ०१ कोटी ८९ लाख ५५ हजार प्राप्त झालेले आहे. याबरोबरच ५,९८,६०० साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ रुग्णालय, श्री साईप्रसादालय मोफत भोजन, संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीसाठी, साईभक्तांच्या सुविधासाठी उभारण्यात येणारे विविध उपक्रम आणि विविध सामाजिक कामासाठी करण्यात येत असल्याचे ही गाडीलकर यांनी सांगितले.