योग्य ती काळजी घेण्याचं पालघर जिल्हा आरोग्य विभागाचं आवाहन
पालघर : चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरस ( Human metapneumovirusvirus ) म्हणजेच ‘एचएमपीव्ही’ ( HMPV ) व्हायरसचा रुग्ण भारतात आढळला असल्यानं राज्यातले आरोग्य विभाग अलर्ट झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरुन न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
ह्यूमन मेटानिमा वायरस हा पूर्वीपासून आपल्याकडे सर्क्युलेशन मध्ये आहे. सद्यस्थितीत चीनमध्ये या विषाणूमुळे साथ सदृश्य स्थिती आहे. हा विषाणू साधारणतः हिवाळ्याच्या सुरुवातीला सर्कुलेशन मध्ये आढळतो. आणि त्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारखे फ्लू सदृश लक्षणे आढळतात.
HMPV विषाणूचा संसर्ग झाल्यास तिव्र श्वसन दाह किंवा रुग्णालयात भरती करण्याची गरज शक्यतो भासत नाही. HMPV विषाणूच्या पार्श्वभुमीवर कार्यक्षेत्रातलं सर्वेक्षण गतिमान करुन सर्दी, खोकला, रुग्णांच्या नियमित सर्वेक्षणाच्या सुचना आरोग्य कर्मचारी यांना देण्यात आल्या आहेत.
ICMR / WHO यांच्या सुचने प्रमाणे पालघर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खालील बाबी सुचित केल्या आहेत.
हे करा :
जेव्हा खोकला किंवा शिंक येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
हे टाळा :
हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर,
आजारी लोकांशी जवळचा संपर्क.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे.