अजमेर शरीफ दर्ग्याहून परतीचा प्रवास अखेरचा ठरला
पालघर : लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या अजमेर शरीफ दर्ग्याहून दर्शन घेऊन परतत असताना पालघर तालुक्यातल्या तीन तरुणांचा कार आणि ट्रकचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता कि या तिन्ही तरुणांना जागीच आपला जीव गमवावा लागला.
पहा व्हिडीओ :
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान राज्यातल्या सुप्रसिद्ध असलेल्या अजमेर शरीफ दर्गा इथे पालघर तालुक्यातले तरुण भाविक दर्शनासाठी गेले होते. दरम्यान अजमेर शरीफ दर्गा इथून दर्शन घेऊन परतत असताना आज सकाळी गुजरात राज्यातल्या अंकलेश्वर परिसरात या भाविकांच्या कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.
या अपघातात कार मधल्या पालघर तालुक्यातल्या मनोरच्या आयान बाबा चोगले, पालघरच्या ताहीर नासिर शेख आणि टाकवहाळच्या मुदस्सर अन्सार पटेल या तीन तरुणांनाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कार आणि ट्रकच्या धडकेत कारचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे. मात्र हा अपघात कसा झाला याचं कारण अद्याप कळू शकेलेलं नाही. काळाने असा घाला घातला कि या तिन्ही तरुणांचा हा प्रवास अखरेचा ठरला. या घटनेची माहिती पसरताच परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.