पालघर : विकास आयुक्त (उद्योग) ( Development Commissioner (Industries) यांच्या निर्देशानुसार राज्यात निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, रोजगार निर्मितीचं लक्ष साध्य करण्यासाठी तसचं निर्यात वाढीसाठी जिल्ह्याला उत्तरदायी बनवण्यासाठी, राज्याकडून केंद्र शासनाच्या जिल्हा हे निर्यात केंद्र या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्यात प्रचालन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून येत्या ८ जानेवारीला निर्यात प्रचालन कार्यशाळेचं ( Export Operations Workshop ) आयोजन करण्यात आलं आहे. वसई पूर्वेकडील हॉटेल रुद्रा शेल्टर इंटरनॅशनल या ठिकाणी हि कार्यशाळा संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे यांनी दिली आहे.
या जिल्हास्तरीय कार्यशाळेत जिल्हातल्या प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रातील गुंतवणुक, व्यवसाय संधीबाबत चर्चा, यशस्वी निर्यातदार उद्योजकांचे अनुभव, निर्यात प्रोत्साहानांसाठी भारत सरकारच्या योजना आणि धोरणे, जिल्हयातील निर्यातीला चालना देण्यासाठी रोड मॅप आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
या कार्यशाळेस सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र आणि राज्य शासनाचे तसचं संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधित कामकाज करणारे घटक, शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन, कौशल्य विकास व रोजगार, जिल्हातील संबंधित शासकीय यंत्रणांचे प्रमुख आदींनी उपस्थित रहावं असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे यांनी केलं आहे.