सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
पालघर : आवडीच्या क्षेत्रात सातत्याने मेहनत केल्यास यशाचे शिखर गाठता येते. यश संपादन केल्यानंतर सामाजिक बांधिलकी विसरु नये. तुम्ही ज्या महाविद्यालयातून शिक्षण घेतले त्या महाविद्यालयाशी नाळ जोडून ठेवा असे प्रतिपादन पालघर नगर परिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.
सोनोपंत दांडेकर वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर वर्गात विशेष यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ‘महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी महाविद्यालयाकडून सोडवल्या गेल्या पाहिजेत असे प्रतिपादन यावेळी सचिन कोरे यांनी केलं.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ‘अपयशाने खचून न जाता नव्या जिद्दीने प्रयत्न करा. अभ्यासातील सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न यामुळे यश निश्चितच प्राप्त होते, असा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव सुधीर कुलकर्णी तसेच प्रकाश संखे, रामकृष्ण निराला, मकरंद दांडेकर, हिमानी राऊत, सचिन चित्रे, अनंत पाटील आदी व्यवस्थापक मंडळाचे सदस्य तसेच उपप्रचार्य डॉ. तानाजी पोळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम, धनादेश आणि ग्रंथभेट देण्यात आली. शैक्षणिक प्रगती आणि इतर क्षेत्रातील विशेष कामगिरी लक्षात घेऊन सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून मितांशू किणी तर सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांनी म्हणून अर्पिता पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि धनादेश देऊन गौरविण्यात आले.

















