उद्योगांनी शिक्षण संस्थांना मदत करावी- मनोज रानडे
पालघर : उद्योगांनी शिक्षण संस्थांना सढळ हस्ते मदत करावी असे प्रतिपादन पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे ( Chief Executive Officer Manoj Ranade ) यांनी केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ( Sonopant Dandekar College ) प्रीमियर इंटरमीडिएट लिमिटेड या औद्योगिक आस्थापनाने उभारलेल्या लीलावती पुरुषोत्तम संघवी यांच्या स्मरणार्थ संगणक प्रयोगशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. भविष्यात प्रशिक्षित आणि उत्कृष्ट मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योजकांनी शिक्षण संस्थांना आर्थिक सहाय्य करताना अधिक उदार दृष्टीकोन बाळगला पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले.
पालघर येथील सोनोपंत दांडेकर कला, वा. श्री. आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र विभागासाठी तयार करण्यात आलेल्या नूतन संगणक प्रमुख प्रयोगशाळेचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या प्रयोगशाळेचे उद्घाटन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रीमिअर इंटरमिजिएट लिमिटेडचे संचालक मनीष पुरुषोत्तम संघवी आणि आशिष शशिकांत संघवी यांनी दांडेकर महाविद्यालयाला संगणक प्रयोगशाळा उभारण्यास आर्थिक सहकार्य केले. याप्रसंगी बोलताना मनोज रानडे यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी तांत्रिक शिक्षणाची नितांत गरज आहे. उद्योजकांनी आपल्या सीएसआर निधीचा विनियोग शैक्षणिक सोयी सुविधांसाठी करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल. त्यांनी प्रीमियर इंटरमिजिएट लिमिटेडच्या या सामाजिक दातृत्वाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सीए सचिन कोरे यांनी भूषविले. त्यांनी अध्यक्षीय मनोगताद्वारे संस्थेच्या भविष्यकालीन उपक्रमांचे सुतोवाच केले. यावेळी प्रीमियर इंटरमिजिएट लिमिटेडचे संचालक आशिष संघवी आणि मनीष संघवी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष धनेश वर्तक, सचिव सुधीर कुलकर्णी, प्राचार्य डॉ. किरण सावे, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, विश्वस्त जगन्नाथ राऊत, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश संखे, व्यवस्थापक मंडळ सदस्य अनंत पाटील, विधी महाविद्यालय प्राचार्या डॉ. पायल चोलेरा, उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ यांच्यासह इतर पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















