सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सुरू होणार मुंबई विद्यापीठ चे दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या ( Palghar District ) ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी आता उच्च शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ( Sonopant Dandekar College Palghar ) आता मुंबई विद्यापीठ ( University of Mumbai ) यांच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र ( Distance and Online Education Center ) सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील दुहेरी पदवी सुविधेचा हा पहिलाच प्रयोग मानला जात आहे.

पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील तसचं नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाशी जोडण्यासाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रामध्ये सामंजस्य करार ( MoU ) करण्यात आला. या करारावर मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. डॉ. शिवाजी सरगर ( Prof. Dr. Prof. Dr. Shivaji Sargar ) आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे ( Principal Dr. Kiran Save ) यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
पालघर मध्ये आक्रोश, एकाच वेळी १२ अंत्यसंस्कारांनी गाव सुन्न
यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. लीलाधर बनसोड, संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे, उपाध्यक्ष सुधीर दांडेकर, धनेश वर्तक, मंगेश पंडित, अनिल पाटील, सुधीर कुलकर्णी आणि उपप्राचार्य महेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. शिवाजी सरगर यांनी सांगितले की, आजच्या काळात स्पर्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी असून युवकांचा कल वेगाने ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणाकडे वाढत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नियमित पदवीसोबत दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये एमबीए, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी आणि नोकरदार नागरिकांना ही याचा लाभ होणार आहे. तसेच प्रवेश आणि परीक्षा शुल्क अत्यंत नाममात्र असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण अधिक सुलभ होणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले आहे.
पालघर मध्ये सुरू होत असलेले हे दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची नवी दारे उघडणारे ठरणार आहे.

















