पालघर : पालघर ( Palghar ) जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात ( Dahanu Taluka ) आज काळजाला चिरणारे दृश्य पाहायला मिळाले. बापूगावातील ( Bapugaon ) लाखात पाडा संपूर्णपणे शोकसागरात बुडाला आहे. काल मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ( Mumbai-Ahmedabad National Highway ) धानीवरी ( Dhanivari ) येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या १२ जणांवर आज एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकामागून एक पेटणारी सरणं आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले.
पहा व्हिडीओ :
कालपर्यंत ज्या घरांमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमाची लगबग सुरू होती, त्याच घरांमध्ये आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदाच्या क्षणासाठी निघालेलं वऱ्हाड काही क्षणांतच काळाच्या पडद्याआड गेलं. गावभर केवळ रडण्याचे आवाज, महिलांचा हंबरडा आणि आपल्या माणसांना गमावल्याची असह्य वेदना पसरली आहे.
सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. बापूगावच्या लाखात पाड्यातील ५० हून अधिक वऱ्हाडी आयशर टेम्पोमधून साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी धानीवरीच्या दिशेने निघाले होते. मात्र केवळ एक किलोमीटरचा वळसा टाळण्यासाठी चालकाने टेम्पो आऊटसाईडने नेण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय जीवघेणा ठरला.
दरम्यान गुजरातहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रेलरने प्रथम एका दुचाकीस्वाराला चिरडले आणि त्यानंतर थेट वऱ्हाडाच्या टेम्पोवर उलटला. अपघात इतका भीषण होता की टेम्पोमधील अनेक जण जागीच चिरडले गेले. आतापर्यंत या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालय आणि धुंदलवाडी येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
आज बापूगावात एकाच वेळी १२ सरणं पेटल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले होते. प्रत्येक डोळ्यात अश्रू होते, प्रत्येक चेहऱ्यावर वेदना होत्या. आपल्या माणसांना अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले. या दुःखद प्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री Ashok Uike, पालघरचे खासदार तसेच जिल्ह्यातील सर्व आमदारांनी उपस्थित राहून कुटुंबीयांचे सांत्वन केले.
















