पालघर : पालघर ( Palghar ) मध्ये प्रेयसीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीने अटकेपूर्वी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे . सध्या सिलवासा येथील नमो हॉस्पिटलमध्ये ( Namo Hospital in Silvassa ) पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात प्रेयसी स्नेहल सावंत हिच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेला आरोपी अमोल मुळे याला पालघर पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं आहे.
वरखुंटी परिसरातील एका वाडीत संशयित व्यक्ती लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली आणि आरोपीला ताब्यात घेतलं. हल्ल्यानंतर आरोपी अमोल मुळे याने केळवा परिसरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दोरी तुटल्याने तो बचावला. त्यानंतर त्याने कथितरित्या विष प्राशन करून पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला.
पहा व्हिडीओ :
विषबाधेमुळे त्याला अगोदर पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला सिलवासा येथील नमो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आहे, जिथे पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्नेहल सावंत यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पालघर पोलीस विविध अंगांनी तपास करत असून, हल्ल्यामागील नेमकं कारण, आरोपीची भूमिका आणि इतर सर्व पैलूंची कसून चौकशी सुरू आहे. प्रेमसंबंधातून घडल्याचा प्राथमिक अंदाज असलेल्या या धक्कादायक घटनेमुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीआहे. आता पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येऊ शकेल.
फरार आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. मात्र हल्ल्यामागील नेमकं कारण काय, आणि या घटनेमागे आणखी कोणते पैलू दडले आहेत, याचं उत्तर आता पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होऊ शकेल.
















