पालघर / नीता चौरे : पालघर जिल्ह्यात वीज चोरट्यांविरुद्ध सुरु केलेल्या व्यापक मोहोमेच्या सुरुवातीला 42 वीज चोरांवर कारवाई करण्यात आली. या चोरट्यांकडून जवळपास दीड लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे.
वीजचोरीला आळा घालण्यासाठी पालघर जिल्ह्यात 10 डिसेंबरपासून व्यापक आणि धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पालघरसह बोईसर, डहाणू, सफाळे, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आदी भागातल्या वीज जोडण्यांची तपासणी करण्यात येत आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 282 वीज जोडण्याची तपासणी करण्यात आलीय. यात 39 ठिकाणी थेट वीजचोरी तर 3 ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. एकूण 42 जणांकडून दीड लाख रुपयांच्या 15 हजार 200 युनिट विजेचा चोरटा वापर झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
वीजचोरीची बिलं भरण्याबाबत संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या असून हे बिल न भरल्यास फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. या मोहिमेत वीज मीटर मधली छेडछाड अचूकपणे शोधण्यासाठी ‘ऍक्यूचेक’च्या मदतीनं जागेवरच मीटर तपासणी करण्यात येत आहे.
मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या नेतृत्वाखाली अभियंते, अधिकारी आणि जनमित्र या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ व १२६ नुसार वीजचोरी हा तीन वर्षांचा कारावास आणि दंडाच्या शिक्षेस पात्र असा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे रीतसर वीजजोडणी घेऊन विजेचा अधिकृत वापर करण्याचं आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केलं आहे.