पालघर / नीता चौरे : 1 ते 31 डिसेंबर पर्यंत राज्यभरात कृष्ठरोग शोधमोहीम सुरू असून पालघर जिल्ह्यात देखील ही मोहीम राबवली जात आहे. कृष्ठ रोगाचे अधिक रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर उपचार करण्याकडे आरोग्य विभागाचा कल आहे.
या मोहिमेअंतर्गत आशा मार्फत 1 डिसेंबर पासून सर्वेक्षण सुरू आहे. जिल्हाभरात 2210 आशा आणि इतर प्रतिनिधींनी आतापर्यंत 3 लाख 19 हजार 854 घरांची तपासणी केली आहे. ग्रामीण भागात 2 लाख 40 हजार 541 तर शहरी भागात 79 हजार 313 घरांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. या सर्वेक्षणातून 8 दिवसामध्ये 2860 संशयित रुग्ण आढळले. त्यातल्या 1132 लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यातून 72 रुग्ण समोर आलेत. तर उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती सहाय्यक संचालक कृष्ठरोग डॉ. संतोष चौधरी यांनी दिली आहे.
यात पालघर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 28 रुग्ण आहेत. वाडयात 8, डहाणूत 5, जव्हार मध्ये 4, विक्रमगड मध्ये 9, वसईत 3, मोखाडयात 2, तर तलासरी तालुक्यात कृष्ठरोगाचे 2 रुग्ण आणि विरार महानगरपालिका क्षेत्रात 1 रुग्ण आढळून आला आहे.
या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणात संशयित कृष्ठरोगाची लक्षणे असलेली व्यक्ती दिसून आल्यावर त्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवलं जातं. त्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. आणि रुग्णास कृष्ठरोगाचं निदान झाल्यास त्याच्यावर त्वरित उपचार सुरू केले जातात. गोळ्यांचा एक डोस दिल्यास रुग्णाचा ९३-९६ टक्के कृष्ठरोगाचा प्रसार थांबतो.
त्यामुळे शरीरावर फिकट लालसर संवेदनाहीन चट्टे, जाड कानाच्या पाळी, गाठी येणे, तेलकट जाडसर आणि सुजलेली त्वचा, अंगावरील त्वचेच्या रंगाच्या किंवा लालसर गाठी आढळून आल्यास स्वतःहून कृष्ठरोगाची तपासणी करावी असं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं आहे. जिल्ह्यात अधिक रुग्ण सापडत असले तरी देखील जास्तीत जास्त रुग्ण शोधून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार कसे करता येतील यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.
कृष्ठरोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी ही मोहीम सुरू असून जास्तीत जास्त संशयित रुग्णांनी स्वतःहून तपासणी करून वेळीच कृष्ठरोगावर उपचार करावेत असं आवाहन पालघर चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी केलं आहे.