विक्रमगड / राहुल पाटिल : मागेल त्याला शेततळे या योजनेद्वारे पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या 78 शेतकऱ्यांना शेततळे मंजूर झालेले होते. शेतकऱ्यांनी तळे खोदाई पुर्ण केली. यापैकी 60 शेतकऱ्यांना अनुदान मिळाले मात्र 18 शेतकरी निधी उपलब्ध न झाल्यानं अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.
मागेल त्याला शेततळे योजनेच्या माध्यमातून विक्रमगड तालुक्यातल्या 78 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 60 लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान मिळालं तर 18 लाभार्थी शेतकरी मात्र अनुदाना पासुन वचिंत राहिलेत. शेतकऱ्यानी स्वतः खर्च करून ही शेततळी काढली. अनुदान मिळेल या आशेत शेतकरी असतांना दोन वर्ष उलटून गेली असून देखील त्यांना अजुन अनुदान मिळालेलं नाहीये. आता अनुदान कधी मिळणार या प्रतिक्षेत शेतकरी आहेत.
लवकर अनुदान जमा करण्याची शेतक-यांची मागणी :
तालुक्यात मागेल त्याला शेततळे योजनेचं 8 लाख 45 हजार 829 रुपये इतकं अनुदान रखडलेलं आहे. या 18 लाभार्थ्यांनी शेततळे पुर्ण केली असुन लवकरात लवकर अनुदान मिळावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
सन 2018 -19 मधले 7 लाभार्थी शेतकरी निधी उपलब्ध नसल्यानं अनुदानापासून वंचित राहिलेत. तर सन 2019 – 20 मधल्या 9 लाभार्थी शेतकऱ्यांना आणि सन 2020 – 21 मधमधल्या 2 लाभार्थी शेतकऱ्यांना अजुनही अनुदान मिळालेलं नाही.