पालघर/नीता चौरे : पालघर जिल्ह्यातल्या वाढवण गावात वाढवण बंदर प्रकल्प जाहीर झालेला असून त्या अनुषंगानं बंदर बनविण्याचं काम जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ( जे.एन.पी.टी ) मार्फत करण्यात येतयं. जे.एन.पी.टी मार्फत प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी काही कंपन्यांना कॉन्ट्रैक्ट देण्यात आलयं. मात्र केंद्र सरकारच्या या प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे.
त्यामुळे हे बंदर रद्द व्हावं या मागणीसाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती, ठाणे जिल्हा मच्छिमार मध्य.सहकारी संघ लि., ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ, आदिवासी एकता परिषद आणि कष्टकरी संघटना यांनी एकत्र येवून उद्या म्हणजेच 15 डिसेंबर ला मुंबई ते डहाणु – झाई पर्यंतच्या किनारपट्टीवरील सर्व गावं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एका बाजूला आम्ही आधीच थर्मल पॉवर च्या प्रदूषणानं त्रस्त आहोत. आमची शेती, बागायती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डहाणू खाडी च्या आमच्या सुक्या माश्यांवर तसचं परिसरातल्या आरोग्यावर ही विपरीत परिणाम झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अणुशक्ती केंद्राचे रेडिएशन आम्ही सहन करत आहोत. त्यातून कॅन्सर सारख्या भयंकर आजारांना आम्ही तोंड देतोय. या दोन्ही विद्युत प्रकल्पाचा एक प्रकल्पग्रस्त म्हणून आम्हाला केवळ त्रासचं झाला आहे. आणि तिस-या बाजूला बोईसर एम.आय.डी.सी ( M.I.D.C ) चं प्रदूषण पराकोटीचं वाढलं आहे. त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्याचे दुष्परिणाम आमच्या आरोग्य आणि पारंपरिक व्यवसायावर अगोदरच कायमस्वरूपी झालेले आहेत. या सर्वातून अगोदरच आम्ही पर्यावरणीय, आरोग्यदृष्ट्या तसचं नष्ट झालेल्या पारंपरिक व्यवसायानं त्रस्त आहोत. आणि अश्यातच हा विनाशकारी प्रकल्प आम्ही आमच्या माथी कदापी मारून घेणार नाही असं इथल्या लोकांचं म्हणन आहे.
मच्छीमार, स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी, बागायतदार आणि डायमेकर्स यांना उध्वस्त करणाऱ्या प्रस्तावित विनाशकारी वाढवण बंदर हे कायम स्वरूपी हद्दपार करण्यासाठी आम्ही एकजुट होवून उद्या मुंबई ते डहाणु – झाई पर्यंतच्या किनारपट्टीवरील सर्व गावं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं यात सहभागी संघटनांकडून सांगण्यात आलंय. या बंदला शिवशक्ति सामाजिक संघटना बोईसर शहर आणि पालघर जिल्हा ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेनं जाहिर पाठिंबा दिला असून सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते आपापल्या रिक्षा बंद ठेवणार आहेत.