पालघर : पालघर जिल्ह्यात महावितरणनं वीज चोरट्यांविरुद्ध धडक मोहिम राबविनं सुरु केलं असून अनेक वीज चोरींची प्रकरण उघडकीस आणली आहेत. या मोहिमे दरम्यान महावितरणलच्या टीमला पालघर तालुक्यातल्या धनसार गावचे सरपंच राजेंद्र घरत यांच्या घरी चोरीच्या विजेचा वापर आढळून आला. तपासणी दरम्यान सरपंच घरत यांच्याकडून महावितरणच्या पथकाला धमकावण्यात आलं आणि त्यांच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्यात आला असल्याची माहिती महावितरणच्या विभागा कडून देण्यात आली आहे. याप्रकरणी महावितरणनं घरत यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पालघर पोलीस करत आहेत.
सरपंच घरत यांच्या घरातल्या मीटरमध्ये फेरबदल करून तसचं मीटर बायपास करून वीजचोरी होत असल्याचं तपासणीत आढळून आलं. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध पथकानं कारवाई सुरु केली. घरत यांनी घरातल्या वीज संच तपासणीत अडथळे आणून घरात येण्यास मज्जाव केला. तसचं महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमकावलं. त्यामुळे महावितरणच्या पथकानं पोलिसांची मदत घेतली. मात्र सरपंच घरत यांनी पोलिसांसमोर पुन्हा शिवीगाळ करून पथकातल्या कर्मचाऱ्यांना धमकावलं असल्याचं महावितरण कडून सांगण्यात आलं आहे.
आता याप्रकरणी घरत विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा करण्यात आला आहे. पोलिसांच्या मदतीनं घरत यांच्या घरातल्या वीज पुरवठ्याची तपासणी केली असता सर्विस वायरला टॅपिंग करुन मिटरविना तसचं मिटरद्वारे अशा दोन्ही प्रकारे वीज पुरवठा करण्याची तजवीज करून वीजचोरी होत असल्याचं आढळून आलं.
या तपासणी घरत यांनी 91 हजार रुपयांची वीजचोरी केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे वीजचोरीचे 91 हजार रूपये आणि दंडाचे ८ हजार रुपये भरण्याची नोटीस घरत यांना देण्यात आली असून भरणा न केल्यास वीजचोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी फिर्याद दिली जाईल. महावितरणनं केलेल्या या कारवाईत धनसार गावात सरपंच घरत यांच्यासह पाच जणांकडची वीजचोरी उघडकीस आली आहे.
आता पालघर जिल्ह्यात वीज चोरट्यांविरुद्ध महावितरणनं धडक मोहीम सुरु केली आहे. ही कारवाई मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या नेतृत्वाखाली नियमितपणे सुरु राहणार आहे. त्यामुळे महावितरणकडून सहजपणे मिळणारी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचं आवाहन महावितरण विभागाकडून करण्यात येत आहे.