पालघर : पालघर च्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयातल्या तपासणी अधिकारी पथकानं स्थानिक पोलीस विभागाच्या मदतीनं पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालूक्या मधल्या शिंपीपाडा, सुकसाळ भागात बीजकेंद्रावर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत विक्रमगड तालूक्यातल्या शिंपीपाडा, सुकसाळ भागात कुलदिप पाटील, आजिम खान सईद अख्तर आणि गुलाम शेख या तिघांच्या मदतीनं गेल्या काही दिवसांपासून चालू असलेलं प्रतिबंधीत मागूर माशांचं प्रजनन केंद्र आणि मागूर मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला आहे. आणि प्रतिबंधीत मागूर प्रजनन करणा-या या संबधीत तिन्हीं जणांवर कलम 188 व 34 नुसार विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईच्या माहीम इथं राहणारा आजिम खान सईद अख्तर आणि मुंबईतल्या जोगेश्वरी इथं राहणारा गुलाम शेख हे दोघे विक्रमगडच्या शिंपीपाडा- सुकसाळ भागत राहणा-या स्थानिक कुलदीप पाटील याच्या राहत्या घराजवळच्या जागेत पॉल्ट्री शेडच्या बाजूला प्रतिबंधीत मागूर माशांचं प्रजनन आणि संवर्धन करत असल्याची गुप्त तक्रार मिळाली. मिळालेल्या तक्रारीनंतर पालघर चे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी तात्काळ प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पालघरच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयातल्या अधिका-यांचं एक पथक तयार केलं. आणि विक्रमगडच्या पोलीस विभागाचं सहकार्य घेवून धडक कारवाई करत शिंपीपाडा- सुकसाळ इथल्या प्रतिबंधीत मागूर माशांच्या बीज केंद्रातले 100 कि.ग्रॅ मागूर मासळी प्रजनक आणि 10 ते 12 लाख मागूर माशांची प्रजनन केलेली अंडी नष्ट केली. तसचं मागूर माशांचं हे केंद्र देखील बंद केलं. या प्रकरणात कुलदीप पाटील, आजिम खान सईद अख्तर आणि गुलाम शेख यांच्यावर कलम 188 व 34 नुसार विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद दत्तात्रय पालव, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी दिनेश हंसराज पाटील, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सुरेंद्र गावडे, संदीप जाधव, पोलीस हवालदार एस.व्हि.मोरे, वाहन चालक महावीर जगताप, शिपाई श्महाले या पूर्ण टीमनं मिळून ही करवाई केली आहे.
प्रतिबंधीत मागूर माशांचं संवर्धन ही जिल्ह्यासाठी अत्यंत डोकेदुखीची समस्या असून Exotic Magur (Clarius gariepinus) या माशांचं मत्स्यसंवर्धन करतांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळण्यासाठी या माशाला खाण्यायोग्य नसलेलं कोंबडीचं मांस तसचं कत्तल खान्यातल्या कुजलेल्या शेळी, मेंढी, गाई, म्हैशी यांचं मांस खादय म्हणून दिलं जातं. मात्र यामुळे पर्यावरणाचा –हास होत असल्याचं आढळून आलं. हा मासा अतिशय मांसभक्षक असल्यामुळे इतर माशांचे मत्स्यपालन करण्यात क्रियाशील आणि अधिकृत मासेमारी व्यवसाय करणा-या मत्स्य व्यवसायीकांना अडचणी निर्माण होत आहेत. संवर्धन करण्यात येणा-या माशांना हे मासे मोठया प्रमाणात भक्षण करत असतात. त्यामुळे मोठया प्रमाणात तलाव / जलाशयातले पारंपारीक मासे जसे कटला, रोहू, मृगल आणि सायप्रिनस आदींच्या संख्येत मोठया प्रमाणात परीणाम होत असल्याचं दिसून आलं. भारतीय प्रजातींना या माशांमुळे धोका निर्माण होत असून या जातीच्या माशांचे प्रजनन, संवर्धन, विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
Original Application No. 381 of 2018 याचिकेच्या 22 जानेवारी 2019 ला पारीत केलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली यांनी मागूर माशांच्या Exotic Magur (Clarius gariepinus) प्रजनन आणि मत्स्यपालन करण्यावर बंदी घातली आहे. या प्रतिबंधीत मागूर माशांचे संवर्धन आणि अस्तीत्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिका-यां समवेत पथक तयार करून मागूर माशांचं संवर्धन होत असलेल्या मत्स्यतळी / तळयांची पहाणी करून अशा प्रतिबंधीत माशांचं संवर्धन होत असल्याचं दिसून आल्यास मत्स्यसाठा नष्ट करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश ही देण्यात आलेत.
त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने ही धडक मोहीम राबवून हे मागूर मत्स्यबीज केंद्र नष्ट केलं आहे. तसचं यापुर्वी 10 डिसेंबर ला मत्स्यव्यवसाय विभागामार्फत भिवंडी तालुक्यातल्या कुंभारशिव इथल्या वन विभागाच्या वनक्षेत्रात, वनपट्टयातल्या जागेत प्रतिबंधीत मागूर माशांचं संवर्धन करणा-या अनधिकृत संवर्धकांना नोटीस बजावणी करण्यात आलीयं. मागूर संवर्धन करणा-या व्यक्तींवर भा.द.वि. 188 व 34 अंतर्गत कठोर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. तसचं मागूर मत्स्यसाठे नष्ट करण्याची कार्यवाही देखील करण्यात येणार आहे.