पालघर / नीता चौरे : शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० नुसार कृषिपंपांना वीजजोडण्या देणं, कृषिपंपाच्या अनधिकृत वीजजोडण्या अधिकृत करणं या कामांना तसचं तब्बल पन्नास टक्के सवलतीच्या संधीचा लाभ देऊन कृषिपंपाची थकबाकी वसुली करण्याच्या कामास गती देण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी दिले आहेत. बोडके यांनी पालघर तालुक्यात शेतकऱ्याच्या थेट बांधावर पोहचुन कृषिपंपाला नवीन वीजजोडणी दिली. तसचं पन्नास टक्के सवलतीचा लाभ घेऊन कृषिपंपाची थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वीजबिलाचा धनादेश स्वीकारला.
३१ मार्च २०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना वीजजोडणी देण्यासाठी शासनानं नवीन धोरण आणलं आहे. या महत्वाकांक्षी निर्णयाची काटेकोरपणे आणि प्राथमिकता देऊन अंमलबजावणी करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक बोडके यांनी दिलेत. वीज खांबांपासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना तातडीनं वीजजोडण्या देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकतेच दिले.
त्यांच्या निर्देशानुसार पालघर तालुक्यातल्या बहाडोली मधल्या जनार्दन चिंतामण किणी दाम्पत्याच्या शेतावर पोहचुन सहव्यवस्थापकीय संचालक बोडके यांच्या हस्ते नवीन वीजजोडणी देऊन कोकण प्रादेशिक विभागात कृषिपंपाना वीजजोडणी देण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलयं. नवीन वीजजोडणीमुळे शेती अधिक किफायतशीर ठरणार असल्याचा आनंद किणी दाम्पत्यानं यावेळी व्यक्त केला.
कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकी वसुलीसाठी तब्बल पन्नास टक्के सवलतीची योजना महावितरणने (MSEDCL) आणली आहे. या योजनेचा लाभ घेत तमसाई इथल्या अनंत भास्कर पाटील यांनी दिलेला त्यांच्या कृषिपंपाच्या थकबाकीचा धनादेश बोडके यांनी स्वीकारला. आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करण्याबाबत ही सूचित केलं.
यावेळी कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, प्रादेशिक कार्यालयातील अधीक्षक अभियंता अनिल घोगरे, महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, उप व्यवस्थापक योगेश खैरनार, पालघरच्या अधीक्षक अभियंता किरण नागावकर, कार्यकारी अभियंते किशोर उईके, जगदीश इंगळे, प्रताप मचिये, युवराज जरग यांच्यासह अधीकारी उपस्थित होते.