पालघर / नीता चौरे : पालघर जिल्ह्यातल्या सागावे, पाली आणि सत्पाळा या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरवात होऊन अवघ्या 1 तासात सर्व मतमोजणी सुरळीतपणे पूर्ण झाली. पालघर तालुक्यातल्या सागावे ग्रामपंचायतीमध्ये आणि वसई तालुक्यातल्या पाली ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी 7 पैकी 3 सदस्य हे बिनविरोध निवडून आल्यानं 4 सदस्यांसाठी निवडणुक झाली. तर वसई तालुक्यातल्या सत्पाळा या ग्रामपंचायतीमध्ये 11 सदस्यांसाठी निवडणुक झाली.
पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्या मधल्या पाली या ग्रामपंचायती मध्ये 7 सदस्यांपैकी 6 सदस्य हे बहुजन विकास आघाडीचे निवडून आल्यानं पाली ग्रामपंचायतीवर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व राहिलं आहे. तर उर्वरित 1 सदस्य हा शिवसेनेचा निवडून आला आहे. 7 सदस्य पैकी 6 सदस्य ह हे बहुजन विकास आघाडी कडे तर 1 सदस्य हा शिवसेनेचा निवडून आला आहे. पाली ग्रामपंचायती मध्ये ओल्गा विलास दुरगुडे ह्या केवळ 1 मतानं निवडून आल्या आहेत. दूरगुडे यांना 51 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या स्विटी स्टीफन बार यांना 50 मतं मिळाली आहेत.
तर दुसऱ्या सत्पाळा या ग्रामपंचाती मध्ये 11 सदस्यांपैकी 9 सदस्य हे मनसे पुरस्कृत ग्राम समृद्धी पॅनलचे निवडून आल्यानं इथं मनसेनं बाजी मारली आहे. तर 2 सदस्य हे बहुजन विकास आघाडीचे निवडून आलेत. सत्पाळा ग्रामपंचातीमध्ये 2 सदस्यांवर बहुजन विकास आघाडीला समाधान मानावे लागलं आहे. ग्राम समृद्धी पॅनल मध्ये मनसे, आदिवासी एकता परिषद आणि निर्भय जन मंच आदी पक्ष सहभागी होते. तसचं पालघर ताल्युक्यातल्या तिस-या सांगावे या ग्रामपंचायती मध्ये 7 सदस्यांपैकी 4 सदस्य हे शिवसेना प्रणीत ग्राम विकास पॅनलचे निवडून आल्यानं इथं शिवसेनेनं बाजी मारली आहे. तर उर्वरित 3 जागा ह्या स्थानिक युवा पॅनलनं जिंकल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आणि जिल्ह्यात 144 कलम लागू असल्यानं कोणत्याही विजयी उमेदवारांना आपला विजयाचा आनंद साजरा करता आला नाही. केवळ गाठीभेटी घेऊन सर्वाना घरी जावं लागलं. पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महापालिकेच्या निवडणुका या एक महिन्यात होण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली ताकत पणाला लावली होती. पण वसईतल्या दोन्ही ग्रामपंचायती दोन्ही पक्षाकडे गेल्यानं येणाऱ्या काळात सत्ताधारी बविआला मोठी व्ह्यूरचना आखावी लागणार आहे.