मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा आज घोषित झाल्या असून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) ची लेखी परीक्षा ही 23 एप्रिल पासून तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) ची लेखी परीक्षा ही 29 एप्रिल पासून सुरु होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षामंडळ संचालक दिनकर पाटील उपस्थित होते.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी माहिती देताना सांगितलं की, इयत्ता 12 वी ची प्रात्यक्षिक परीक्षा ही 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान होईल. तर लेखी परीक्षा ही 23 एप्रिल ते 29 मे या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. तर इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 9 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान होतील. आणि लेखी परीक्षा या 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.
कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात 9 वी ते 12 वी च्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. आणि 21 हजार 287 शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेऊन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8 टक्के विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. अशी माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली.