पुणे : सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला कोणताही फटका बसलेला नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सिरम इन्स्ट्यिट्यूटच्या टिमशी त्यांनी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण जगात कोविडचे संकट अद्यापही संपलेले नाही, गेल्या आठवड्यात सिरमच्या लसीमुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. लस बनविणाऱ्या केंद्रात आग लागली ही बातमी आली. दुदैवाने या दुर्घटनेत पाच कामगार मृत्यूमुखी पडले. लस बनवली जाते तो केंद्र साठा संपूर्णपणे सुरक्षित आहे. आगीचे वृत्त समजताच तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती घेतली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या इमारतीमधील पहिले दोन मजले वापरात आहेत. वरील दोन मजले जिथे नवे केंद्र सुरू केले जाणार होते त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. मात्र कोविडची लस जिथे बनवली जाते ते केंद्र अंतरावर आहे. सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला कोणताही फटका बसलेला नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होवून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृत्यू झालेल्या कुटुंबाची जबाबदारी सिरम कंपनीने घेतली आहे. त्याशिवाय काही आवश्यकता असेल तर शासन ती मदत निश्चित करेल असे ठाकरे यांनी सांगितले.
सिरमचे अदर पुनावाला म्हणाले, कोरोना लसीच्या पुरवठयावर कोणताही परिणाम नाही. बीसीजी आणि इतर लसीचे नुकसान झाले आहे. कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा सुरळीत असून लसीवर परिणाम नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे,कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार गिरीश बापट, आमदार चेतन तुपे, सिरमचे अदर पुनावाला, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्यमंत्री यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, आरोग्य सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.