भाजप नेते विनोद तावडे, भाजपचे नालासोपारा विधानसभेचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करत नालासोपारा पूर्वेला असलेल्या विवांता हॉटेलमध्ये एकच गोंधळ घातला. आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना हॉटेलच्या खोलीत घेराव घालत विनोद तावडे यांच्यासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या नेत्यांवर ते गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागले. त्यांच्याकडून काही रक्कम आणि अनेक डाय-या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात मतदारांसह अनेकांना पैसे वाटल्याच्या नोंदी आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांमध्ये एवढा रोष होता की त्यांनी पोलिसांचं ही ऐकलं नाही. तर दुसरीकडे हॉटेलमध्ये उपस्थित असलेले लोक बाहेर पडू लागल्यावर पोलिसांनी त्यांची झडती घेतल्यानंतरच त्यांना बाहेर जाऊ दिलं. जवळपास आठ तास हा गोंधळ सुरूच होता, अखेर आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विनंतीवरून कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना सोडलं आणि ते शांत झाले.
तुळींज पोलिसांनी भाजपचे नेते विनोद तावडे आणि नालासोपारा विधानसभेचे भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यासह 250 जणांवर कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी बी.एन.एस कायदा कलन 223 आणि आर.पी.टी एक्ट 1951 कलम 126 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न होती, मात्र पोलिसांनी ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज जप्त केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाबाबत माहिती देताना पालघरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके म्हणाले की, निवडणूक प्रचार संपल्यानंतर तावडे यांनी कायदेशीररित्या मतदारसंघाच्या बाहेर जाणं आवश्यक होत. मात्र कायद्याचे उल्लंघन करून ते तिथेच थांबले. आणि बेकायदेशीरपणे पत्रकार परिषद देखील घेतली. कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून 9 लाख 93 हजार रुपये जप्त केले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे प्रतिद्वंदी उमेदवार क्षितीज ठाकूर या प्रकरणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले कि, 9 लाख नव्हे तर १९ लाख रुपये होते. उर्वरित रक्कम गेली कुठे ? जर ते पैसे वाटत नव्हते तर तावडे गोदाम मध्ये आणि त्यांचे उमेदवार राजन नाईक महिलांमध्ये लपून का बसले होते.