भाजप केवळ थापा मारण्याचं काम करत – उद्धव ठाकरे
पालघर : महाविकास आघाड़ीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पालघर विधान सभेचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार विश्वास वळवी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी आज बोईसर शहरात जनसभेला संबोधित केलं.
यावेळी आपली खंत व्यक्त करताना ते म्हणाले की, आमदार श्रीनिवास वनगा ला आपण निवडून दिलं पण ते तिकडे गेले, आणि आता श्रीनिवास यांना तिकडून फेकून दिलं गेलं आहे. उद्धव ठाकरे भाजप वर टीका करताना म्हणाले की, वापरा आणि फेका ही भाजपची वृत्ती आहे. माझ्या बॅगा वारंवार चेक केल्या जात आहेत, मात्र मोदी आणि शहा यांच्या बॅगा कोणी चेक करत नाही. भाजप केवळ थापा मारण्याचं काम करत आहे असा टोला त्यांनी यावेळी आपल्या शब्दातून लगावला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गुजरात हून लोकं येऊन राहत आहेत आणि ते इथल्या लोकांवर नजर ठेवत आहेत असं ही ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार मिंदे म्हणत त्यांच्यावर सडकून टीका केल्या. ते भाजप टीका करताना म्हणाले की, भाजप आदिवासींचं , कोळी बांधवांच अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपलं सरकार सत्तेत आल्यास मुलांना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून हमी भाव देऊ, कॅशलेस आरोग्य सुविधा आणू असं वचन जनतेला दिलं. जर वाढवण आणि मुरबे ही दोन बंदरे नको असतील तर आमचे दोन्ही आमदार निवडून द्या असं आवाहन त्यांनी यावेळी पालघर आणि बोईसरच्या जनतेला केलं.