पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री योजनादूत पदाच्या 1851 जागांसाठी होणार पदभरती
पालघर : शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री योजनादूत या पदाच्या 1 हजार 851 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करून आपला अर्ज करता येईल. या माध्यमातून पात्र उमेदवारांना पालघर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयांतर्गत काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती पालघर जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव यांनी दिली आहे.
टी.बी विरुद्धच्या लढाईत आता प्रौढांना देण्यात येणार बी.सी.जी लस….
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया कडून मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिलं जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्याचं कार्य करतील.
पात्रता :
यासाठी इच्छुक उमेदवार हा १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला, उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र आदी नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर आपल्या अर्जांची नोंदणी करता येईल.

















