नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये ( Delhi ) महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे ( Rural Development and Panchayat Raj Minister Jaykumar Gore ) आणि महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला ( Maharashtra Sadan Resident Commissioner and Secretary R. Vimala ) यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली.
ग्रामविकास मंत्री गोरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी निवासी आयुक्त यांच्या संकल्पनेतील बचतगट वस्तू प्रदर्शन व विक्री दालनबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच मंत्री गोरे यांनी प्रस्तावित जागेची पाहणी देखील केली. यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार उपस्थित होत्या.
महाराष्ट्र सदनात येत्या काळात या महिलांना फिरते दालन उपलब्ध करून दिले जाईल. या दालनात गृहउपयोगी तसेच सजावटीच्या आणि वाळवणाच्या वस्तू यासह एक जिल्हा उत्पादन, भौगोलिक मानांकन असणारे उत्पादन अशा वस्तू राहतील. यामुळे महाराष्ट्रातील महिलांना राजधानीत व्यासपीठ उपलब्ध होईल असे विमला यांनी सांगितले.
मंत्री जयकुमार गोरे यांनी या उपक्रमासाठी सकारात्मकता दर्शविली असून स्वयं सहायता गटांचे दालन महाराष्ट्र सदनात सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधिताना सूचित देखील केले.