पालघर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकां मध्ये लोकशाही मूल्ये, निवडणूक, मतदान प्रक्रिया, ओळख याविषयी जनजागृती करण्यासाठी स्वीप कार्यक्रमा अंतर्गत आज पालघर शहरात विद्यार्थी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पालघर शहरातील सात महाविद्यालयांनी महाविद्यालय ते पाचबत्ती हुतात्मा चौक अशी रॅली काढत या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी जनजागृती पर घोषणा देत आणि मतदानाविषयीचे संदेश असलेले फलक हातात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली.
या रॅलीत सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, दांडेकर लॉ कॉलेज, चाफेकर कॉलेज, सेंट जॉन कॉलेज, जे.पी.कॉलेज ऑफ एज्युकेशन रिसर्च सेंटर, आयटीआय कॉलेज पालघर आणि स.तू. कदम विद्यालय आदी विद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या रॅली नंतर विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. दरम्यान यावेळी जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालयांनी रॅली काढून मतदान जनजागृती केली.