अंतर्गत गटबाजीचा धोका
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू विधानसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हा आदिवासी बहुल असा मतदार संघ आहे. डहाणू विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार विनोद निकोले आणि महायुती मधल्या भाजपचे नवे उमेदवार विनोद मेढा यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत घटक पक्षांमधील आंतरिक गटबाजी आणि नाराजीच्या सुरांमुळे उमेदवारांना फटका बसण्याची संभावना व्यक्त केली जात आहे. मात्र यातून यश कोणाला मिळू शकेल हे तर निवडणुकीच्या निकालानंतरचं समजू शकेल.
डहाणू मतदारसंघात एकूण 3,01,239 इतके मतदार असून त्यात 149627 इतके पुरुष मतदार असून 1,51,578 इतक्या महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदार हे 34 आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर या मतदार संघात 17820 इतक्या मतदारांची वाढ झाली आहे. या मतदारसंघावर 1972 पासून पाच वेळा काँग्रेस, दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस, तीन वेळा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि एक वेळा भाजप असं या पक्षाचं वर्चस्व राहिलं आहे.
डहाणू विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये झालेलं मतदान :
विनोद निकोले ( मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ) – 72114
पास्कल धनारे ( भारतीय जनता पार्टी ) – 67407
2024 च्या लोकसभा निवडणुकीत डहाणू विधानसभा मतदारसंघातलं मतदान :
डॉक्टर हेमंत सवरा ( भारतीय जनता पार्टी ) – 83000
भारती कामडी ( उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ) – 83882
राजेश पाटील ( बहुजन विकास आघाडी ) – 12792
2014 मध्ये डहाणू विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा भाजपचे पास्कल धनारे निवडून आले होते. त्यांनतर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांच्या मदतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले ४७०७ मतांनी निवडून आले. आता 2024 विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून विनोद निकोले यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजप कडून विनोद मेढा हा नवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे. याशिवाय या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडून सुरेश पाडवी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विजय वाढीया, जिजाऊ पुरस्कृत अपक्ष उमेदवार कल्पेश भावर यांच्यासह अन्य तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी मुख्य लढत हि भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोन पक्षांच्या उमेदवारां मध्ये होणार आहे.
मतदार संघातील पक्षांचे प्राबल्य :
डहाणू विधानसभा मतदारसंघात काही भागात भाजप चं वर्चस्व आहे तर काही भागात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांचे वर्चस्व विविध भागात जवळपास समसमान असल्याने ही लढत अगदी चुरशीची होणार आहे. भाजप कडून नवा चेहरा देण्यात आल्याने भाजपला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. डहाणू मधून माजी आमदार अमित घोडा ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळी वेळी भाजप कडून विनोद मेढा यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अमित घोडा आणि त्यांचे निकटवर्ती नाराज असून त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत अंतर्गत गटबाजीचा प्रभाव दिसून येवू शकेल.