पालघर : महाराष्ट्र राज्याचा 100 दिवसांचा 7 कलमी कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून देखील जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा 7 कलमी कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
या 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेकडून 100 दिवसांचं मुल्यमापन करण्यात आलं होतं. त्यात पालघर पोलीस दलास 100 गुणांपैकी 90.29 गुण प्राप्त झाले आहेत. त्यामुळे 100 दिवसांच्या कार्यालयीन मुल्यमापनानंतर पोलीस विभागातून महाराष्टातल्या एकूण 34 जिल्ह्यातल्या पोलीस दलामधून पालघर जिल्हा पोलीस दलाने ( Palghar Police Force ) पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या अगोदर देखील 50 दिवसांच्या कार्यालयीन मुल्यमापनात पालघर जिल्हा पोलीस दलाने प्रथम क्रमांक मिळवला होता.
या 100 दिवसांच्या 7 कलमी कार्यक्रमात वेबसाईट, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोई सुविधा, आर्थिक आणि औद्यागिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदी विषय देण्यात आले होते.
या अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाने पोलीस प्रशासन लोकाभिमुख आणि गतीमान करताना वेबसाईट अद्ययावत करून User Friendly बनवली, नागरिकांसाठी Chat Box सुविधा, सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम, Al based Chat Bot, स्वच्छता मोहिम, तक्रार निवारण दिन, ई-ऑफिस कार्यप्रणाली, Visitor Management System, कार्यालयीन कामकाजामध्ये AI चा वापर, पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी थर्ड आय अॅप्लीकेशन असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. ज्यामुळे पालघर पोलिस दलाला महाराष्ट्र राज्यात प्रथम स्थान मिळवण्यात यश आलं आहे.