पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सारखे दिसणारे व्यक्ती बनले आकर्षणाचे केंद्र
पालघर : पालघर जिल्ह्यातील वसई येथील रुद्र शेल्टर हॉटेलच्या सभागृहात राष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला बाल विकास आयोगाने समाजात चांगले कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि पत्रकारांचा सन्मान करत त्यांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सारखे दिसणारे महाकाल आखाड्याचे डॉ. योगी विजेंद्र नाथ आणि पंतप्रधान मोदी यांच्या सारखे दिसणारे विकास महंते हे आकर्षणाचे केंद्र ठरले. आणि प्रत्येकजण त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक दिसून येत होते.
यावेळी आयोगाचे मुख्य सचिव डॉ. रवींद्र मिश्रा म्हणाले की, राष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला बाल विकास आयोगाच्या अधिवेशनात संत-ऋषींसह देशभरातील सामाजिक कार्यकर्ते, अधिवक्ते, पत्रकार, अधिकारी आणि संस्थांचे प्रतिनिधी यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ३० एप्रिल ला हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही या कार्यक्रमात देशभरातील १०० हून अधिक व्यक्तींना राष्ट्रीय संत गौरव पुरस्कार २०२५ आणि इतर सन्मानांनी सन्मानित करण्यात आले. पुढे बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला आणि बाल विकास आयोग महिला सुरक्षा आणि बाल कल्याण क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहे. याअंतर्गत, महिला आणि बाल सुरक्षा, कायदेशीर जागरूकता, सायबर गुन्हे, घरगुती हिंसाचार आणि बाल शोषण यासारख्या विषयांवर तज्ज्ञांच्या पॅनेलच्या माध्यमातून चर्चा आयोजित केल्या जातात. ज्यामध्ये ज्येष्ठ वकील, पत्रकार, समाजशास्त्रज्ञ आणि माजी न्यायाधीश आपले विचार मांडतात.
यावेळी परमपूज्य दिगंबर सत्यगिरी, इंदोर हून आचार्य शिवप्रीती माँ, निरंजनी आखाडा, हरिद्वार हून पंकज गिरी महाराज, श्री पंचायती आखाडा महानिर्वाणीचे अनंतश्री विभुषित महामंडलेश्वर स्वामी देवस्वरूपानंद सरस्वती, आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दयाराम मिश्रा, आयोगाच्या संस्थापिका शांतीदेवी मिश्रा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.