पालघर : अदाणी इलेक्ट्रिसिटी, अदाणी फाउंडेशन आणि पालघर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधल्या उपजिल्हा रुग्णालयात नवजात शिशुंसाठी अद्ययावत अतीदक्षता विभागाची निर्मिती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणी आधी नवजात बालकांसाठी केवळ उपचार केंद्र होतं. मात्र आता याठिकाणी सुसज्ज अतिदक्षता विभाग तयार आला आहे. याठिकाणी 22 नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग, 2 व्हेंटीलेटर, 2 बबल यंत्र, 3 एलएडी फोटो थेरपी मशीन, स्तनपान करणाऱ्या मातांसाठी 9 विश्रांती बेड आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
डहाणू परिसरात नवजात बालकांसाठी अतिदक्षता केंद्र नसल्यामुळे तिथे महिन्याला तीन ते चार नवजात बालकांचा मृत्यू होत होता. ही परिस्थिती पाहता यापूर्वीच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी अशा उपक्रमासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनशी संपर्क केला होता. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये या प्रस्तावावर प्राथमिक चर्चा झाल्यानंतर अदाणी फाउंडेशनने या केंद्रासाठी निधी मिळवून दिला आणि केंद्राची उभारणी केली.
परिसरातील नवजात बालकांना या सुविधेची अति गरज असल्यामुळे ती पुरवण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. असं मत अदाणी फाउंडेशनच्या प्रवक्त्यानी व्यक्त केलं. परिसरातील नागरिकांना साह्य करून त्यांच्याशी असलेले संबंध दृढ करण्याचा निर्धार नवजात शिशुंसाठी अतिदक्षता केंद्र उभारण्याच्या प्रयत्नांतून व्यक्त होतो असं मत यावेळी अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या प्रवक्त्यानी व्यक्त केलं.