पालघर : पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी ग्रामीण भागा मधल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा आणि सेंट गोबेन जिप्रोक बिझनेस, मुंबई यांच्यात बांधकाम क्षेत्र विभागाचा एक भाग असलेला ‘ड्राय वॉल आणि फॉल्स सीलिंग’ हा व्यवसाय शिकवण्या बाबत सामंजस्य करार करण्यांत आला आहे. कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यांत आला. यावेळी सेंट गोबेन जिप्रोक बिझनेस मुंबई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदीप कोलते हे उपस्थित होते.
या करारांतर्गत सेंट गोबैन कंपनी ही आय.टी.आय.वाडा इथं प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक त्या अद्यायावत् कार्यशाळेची निर्मिती करून देणार आहेत. तसचं प्रशिक्षण कालावधीत लागणारा कच्चा माल, आवश्यक हत्यारे, अवजारें, संबंधित उपकरणे, सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक अभ्यासक्रमा संदर्भातली क्रमिक पुस्तकें आदी उपलब्ध करून देतील.
‘ड्राय वॉल आणि फॉल्स सीलिंग’ हा व्यवसाय अभ्यासक्रम शिकवणारं वाडा केंद्र हे महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र होणार आहे. आणि शासकीय संस्थां मधलं भारतातलं हे पहिलं केंद्र असेल. या प्रशिक्षणाची जबाबदारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या निदेशक शिक्षकांवर असेल. या निदेशक शिक्षकांना या व्यवसायातले अतिरिक्त प्रशिक्षण हे सेंट गोबैन कंपनी कडून दिलें जाणार आहे. या व्यवसायात उत्तम आणि यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना भविष्यात काम देण्याची जबाबदारी सेंट गोबैन कंपनी घेणार असल्याची माहिती वाडा आयटीआय प्राचार्य रोहन चुंबळे यांनी दिली.
ड्राय वॉल आणि फॉलस् सीलिंग :
सध्या हा बांधकाम व्यवसाया मधला मोठा वाढतां प्रगत व्यवसाय असून बांधकाम क्षेत्रातील व्यवसायासोबतच या व्यवसायाला वार्षिक १२ ते १५ टक्के वाढ आहे. घराला वापरण्यात येणारे जीप्सम् बोर्डस् चा मुख्यत्वें वापर येथे केला जातो. वाडा मधल्या प्रशिक्षण केंद्रात विविध स्तरातील उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, मेसन, पेंटर, इंटेरियर डेकोरेटर, प्लंबर, वूडवर्क टेक्निशियन आदी व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना ही हे संलग्न प्रशिक्षण उपयोगी आणि उपयुक्त ठरेल.
आतापर्यंत सेंट गोबैन कडून देशात १५०० उमेदवारांना प्रशिक्षित केलं गेल आहे. यातले ५२ उमेदवार हे ‘उत्तम उद्योजक’ बनून पुर्ण वेळ हा व्यवसाय करत आहेत. भविष्यात या प्रशिक्षित उमेदवारांना युरोपीय देशांमध्ये ही कामाची उत्तम संधी उपलब्ध करून देण्याबाबत उच्चस्तरीय चर्चा चालू असल्याची माहिती या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदीप कोलते यांनी दिली. तसेच आयटीआय वाडयाने घेतलेल्या सकारात्मक पुढाकाराबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं.
या केंद्रातून जिल्ह्यातल्या आदिवासी, बेरोजगार, वंचित तरुण-तरुणींना एक नवीन बांधकाम व्यवसायात उतरण्याची संधी मिळावी यासाठी व्यक्तिशः आपण लक्ष घालून हा करार केला आहे असं संस्थेचे प्राचार्य रोहन चुंबळे यांनी सांगितलं.