पालघर : सध्या पालघर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. उन्हाळा वाढला असल्यानं बाजारात ताज्या फळांची आणि शरीरासाठी थंड असणाऱ्या फळांची मागणी मोठ्यप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विविध बाजारपेठांमध्ये, रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कलिंगडाची, खरबूजांची आणि नारळ पाण्याची विक्री होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर नागरिक उसाच्या रसाला, विविध फळांच्या रसाला आणि विविध शीतपेयांना पसंती देताना दिसून येत आहेत.
जिल्ह्यातल्या विविध भागांत ठीकठिकाणी कलिंगडाचे स्टोल मोठ्या प्रमाणात लावलेले दिसून येत आहेत. सध्या नागरिक हि या फळाला मोठ्या प्रमाणात पंसती देत आहेत. त्यामुळे कलिंगडची आवक जिल्ह्यात वाढली आहे. उन्हाचा कडाका वाढला असल्याने कामानिमित्त बाहेर निघणाऱ्या किंवा इतरत्र प्रवासासाठी जाणाऱ्या नागरिकांची उन्हामुळे दमछाक होते. अशात लोकं या फळांना, रसांना आणि शीतपेयांना महत्व देत आहेत.
बदलत्या वातावरणात आपल्याला आरोग्याची ही काळजी घेणं गरजेचं असत. उन्हाळ्यात ताजी फळे खाल्ल्याने शरीराला भरपूर पोषण आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. या दिवसांमध्ये एक फळ आवर्जून खाल्लं जातं आणि ते म्हणजे कलिंगड (Watermelon). कलिंगड हे एक रसाळ फळ आहे. कलिंगडात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे आपलं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. कलिंगडमधील व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीनच्या पातळीमुळे त्वचा निरोगी राहण्यास आणि केसांना मजबुती मिळण्यास मदत होते.
पालघर जिल्ह्यात या काळात अनेक शेतकरी कलिंगडची आणि खरबूजची शेती करू लागले आहेत. या शेतक-यांकडून विविध ठिकाणचे व्यापारी येवून थेट माल विक्रीसाठी घेवून जात असतात. त्यामुळे जिल्ह्यातल्या वाडा भागातून तसचं नाशिक जिल्ह्यातल्या रामपूर भागातून जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी हे कलिंगड विक्रीसाठी आणले जात आहेत. सध्या बाजारात 25 रुपये किलो या दरा प्रमाणे कलिंगडची विक्री केली जात. तसचं कलिंगडच्या चिरी देखील प्रत्येकी १० रुपयांना विकली जात आहे. त्यातच आता रमजान महिना सुरु असल्यानं बाजारात या फळांची मागणी वाढली आहे.