आशिया कपसाठी पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधल्या खेळाडूंची निवड
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणा-या रितेश रवी दुबळा आणि आयुष हरिश्चंद्र गवळी या दोन खेळाडूंची मलेशियात होणाऱ्या आशिया कप स्लिंगशॉट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
११ व्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप ही नुकतीच शिर्डीत पार पडली. या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातल्या रितेश दुबळा आणि आयुष गवळी या दोघांनी ही सुवर्ण पदके पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे त्यांना आशिया कपसाठी भारत देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
१२ आणि १४ वर्षांखालील गटात दोघांची कामगिरी :
११ व्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप १२ वर्षांखालील मुलांच्या गटात डहाणू तालुक्यातल्या घोलवड केंद्राच्या रामपूर खेडपाडा या जिल्हा परिषद शाळेतल्या रितेश रवी दुबळाने सुवर्ण पदक मिळवले. याच गटात रविंद्र वशिश याने रजत पदक जिंकले. तसचं १४ वर्षांखालील मुलांच्या गटात आशागड केंद्राच्या कोटबी बुजडपाडा जिल्हा परिषद शाळेतल्या आयुष हरिश्चंद्र गवळी याने सुवर्ण पदक मिळवले. तर नीरज पागीने रजत पदकाची कमाई केली.
कोटबी बुजडपाडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनील देशमुख यांनी माहिती देताना सांगितलं कि, राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळवलेले विजेते रितेश दुबळा आणि आयुष गवळी हे मलेशिया मध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ज्यासाठी त्यांची तयारी सुरु आहे.