पुरुषांमध्ये रोहित वर्मा, महिलांमध्ये सोनिका ठरले हाफ मॅरेथॉनचे विजेते
पालघर : थंड वाऱ्याची झुळूक आणि आल्हाददायक हवामानाचा पुरेपूर वापर करत 12 व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन ( Vasai-Virar Municipal Corporation Marathon ) मध्ये उच्चभ्रू खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली. देशातल्या सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धेपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत ५८ लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक विजेती साक्षी मलिक या मॅरेथॉनची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून उपस्थित होती.
2 तास 18 मिनिटे आणि 19 सेकंदांच्या वेळेसह, साताऱ्याच्या कालिदास हिरवेचा कोर्स रेकॉर्ड केवळ पाच सेकंदांनी चुकला, मात्र त्याने चांगली धाव घेत पुरुषांची मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. हिरवे यांच्या पाच सेकंद मागे त्याचा जवळचा मित्र प्रदीपसिंग चौधरी राहिला. दोन वेळा विजेता, दोनदा उपविजेता आणि कोर्स रेकॉर्ड धारक मोहित राठोडने तिसरे स्थान पटकावले. हिरवे यांना बक्षीस म्हणून तीन लाख रुपये देण्यात आले.
पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये नौदलाच्या रोहित वर्माने नितेश रथवा ला केवळ 1 सेकंदाने मागे टाकत अव्वल दोन स्थानांसाठी फोटो-फिनिश केले. उल्लेखनीय म्हणजे, अव्वल पाच धावपटूंनी 2019 मध्ये अनिश थापाने सेट केलेला 1:04.37 चा कोर्स रेकॉर्ड मोठ्या फरकाने मोडून काढला. आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी देखील नोंदवली. वर्मा यांना बक्षीस म्हणून दोन लाख रुपये देण्यात आले.
या मॅरेथॉन मध्ये हरियाणातील रेल्वे कर्मचारी सोनिका हिने महिलांची अर्ध मॅरेथॉन 1:13.22 च्या वेळेसह जिंकली. हरियाणाची भारती 1:13.51 गुणांसह दुसऱ्या तर साक्षी जड्याल 1:14.51 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. सोनिकाला यावेळी बक्षीस म्हणून दोन लाख रुपये मिळाले.