प्रारब्ध युग न्यूज नेटवर्क : श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला ही तितकेच महत्व आहे. मार्गशीर्ष महिन्याला पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष गुरुवारला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. स्त्रिया आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि देवीची प्रसन्नता टिकवून ठेवण्यासाठी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोठ्या श्रद्धेने हे व्रत करतात. यावर्षी मार्गशीर्ष महिना २ डिसेंबरपासून सुरू झाला असून मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आज आहे.
महाराष्ट्रात आज घराघरांत मोठ्या भक्तिभावाने श्री महालक्ष्मी ची पूजा अर्चना करून हे व्रत करण्यात आलं. या मार्गशीर्ष महिन्यात 5,12,19 आणि 26 डिसेंबर असे चार गुरवार हे महालक्ष्मी व्रत केलं जाईल. 26 डिसेंबर ला गुरुवारच्या व्रतांचं उद्यापन करण्यात येईल.
मार्गशीर्ष गुरुवार २०२४ तारखा :
पहिला मार्गशीर्ष गुरुवार – ५ डिसेंबर २०२४
दुसरा मार्गशीर्ष गुरुवार – १२ डिसेंबर २०२४
तिसरा मार्गशीर्ष गुरुवार : १९ डिसेंबर २०२४
चौथा मार्गशीर्ष गुरुवार : २६ डिसेंबर २०२४
मार्गशीर्ष गुरुवार चे महत्त्व :
आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे, समाधान मानणे, त्याचा गर्व करू नये हे का महत्त्वाचे आहे ते भद्रश्रवा राजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच कथेचे वाचन, श्रवण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते. तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो.
मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करावी :
मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्या अगोदर ती जागा स्वच्छ करून घ्यावी. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. त्याभोवती रांगोळी काढावी. चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर थोडे तांदूळ पसरवावे. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला आठ दिशांनी हळद-कुंकु लावून त्यात पाणी, अक्षता, दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी. कलशात पाच वृक्षाच्या फांद्या ठेवाव्यात. त्यावर नारळ ठेवावे. आणि कलशाची स्थापना करावी. आता चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. मिष्ठान्न ठेवावे. नैवेद्य ठेवावे. यानंतर विधीवत पूजा करून देवीची पोथी वाचावी. संध्याकाळी गोपूजन करून उपवास सोडावा. दुसऱ्या दिवशी पूजन करून कलशातील जल तुळशीला अर्पण करावे. कलशातील वृक्षांच्या फांद्या एखाद्या नदीजली किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी नेवून ठेवाव्यात.